प्रजासत्ताक दिनी शौर्यपदक मिळालेल्या लष्करातील एका अधिकाऱ्यासह दोन सुरक्षा अधिकारी आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात झालेल्या चकमकीत मंगळवारी ठार झाले.
कर्नल एम. एम. राय, ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी मिंडोरा गावात झालेल्या चकमकीत ठार झाले. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन स्थानिक दहशतवादीही ठार झाले.
प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शौर्यपदक विजेत्यांमध्ये कर्नल राय यांचा समावेश आहे. काश्मीरच्या दक्षिण भागांत गेल्या वर्षी दहशतवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले होते, असे प्रवक्त्याने सांगितले. कर्नल राय उत्तर प्रदेशच्या गाझीपूरचे रहिवासी असून ते लष्कराच्या नऊ गुरखा रायफल्समध्ये अधिकारी होते. सध्या त्यांची नेमणूक ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर म्हणून झाली होती. त्यांच्या मागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
स्थानिक हिजबुल दहशतवादी आपल्या साथीदारांसह येथे आले असल्याची खबर मिळाल्याने पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने कारवाई केली. त्यामध्ये दहशतवादी ठार झाले. आदिल खान आणि शिराज दार अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षारक्षकांनी शस्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day after winning gallantry award army colonel killed in encounter with hizbul militants
First published on: 28-01-2015 at 12:17 IST