प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उघडकीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू काश्मीर पोलिसांनी गुरुवारी ‘जैश-ए-मोहम्मद’च्या पाच दहशतवाद्यांना अटक करून प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला.

श्रीनगरमधील हजरतबल भागातून अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके आणि इतर घातक साहित्यही हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. श्रीनगर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदचे जाळे उद्ध्वस्त केले असून प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उघडकीस आणल्याचे ट्विट जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले आहे.

एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद चिकला, साहिल फारूख गोजरी आणि नसीर अहमद मिर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. ते ‘जैश ए मोहम्मद’ या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचे आहेत. या दहशतवाद्यांनी २६ जानेवारीला श्रीनगरमध्ये आत्मघाती किंवा आयईडी स्फोट घडवण्याचा कट रचला होता. हे दहशतवादी काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सामील होते, अशी माहितीही उजेडात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तपास यंत्रणा दहशतवाद्यांची कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडून आणखी दहशतवादी कारवायांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तेथे ५ ऑगस्टपासून लागू केलेले र्निबध हटवण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलिसांनी हा कट उघडकीस आणला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील उपपोलीस अधीक्षक देविंदर सिंग यांच्यासह दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

जप्त शस्त्रसाठा

दहशतवाद्यांकडून जिलेटिनच्या १४३ कांडय़ा, ४२ डिटोनेटर्स, सात दुय्यम स्फोटके, सायलेन्सर, स्फोटके लपवलेले जॅकेट, स्फोट घडवणारा दूरनियंत्रक बसवलेला वॉकीटॉकी, देशी बंदुका आदी शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day of the attack unfolds in republic day akp
First published on: 17-01-2020 at 02:15 IST