पतीच्या तक्रारीनंतर त्याच्या पत्नीला आणि तिच्या लेस्बियन पार्टनरला पोलिसांनी अटक केली आहे. ३८ वर्षांच्या एका व्यक्तीने आरोप केला की त्याची पत्नी लेस्बियन अर्थात समलैंगिक आहे. पत्नीने आणि तिच्या लेस्बियन पार्टनरने पाच महिन्यांच्या बाळाची गळा दाबून हत्या केली असा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. ज्यानंतर या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील केलामंगलम भागातील आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश नावाचा एक माणूस त्यांच्याकडे तक्रार घेऊन आला. त्याने सांगितलं की माझी पत्नी भारती आणि मला तीन मुलं होती. ज्यापैकी दोन मुली आणि एक मुलगा होता. ५ नोव्हेंबरला आमचा पाच महिन्यांचा मुलगा म्हणजेच आमचं बाळ बेशुद्ध झालं. त्याला घेऊन आम्ही रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि मृत घोषित केलं. मात्र पत्नीचे व्हॉट्स अॅप चॅट पाहून हे कळलं की हा मृत्यू नैसर्गिक नाही. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि भारतीसह तिच्या लेस्बियन पार्टनरला अटक केली.
बाळाच्या मृत्यूनंतर सुरेशला आला संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाच्या मृत्यूनंतर सुरेशला पत्नीवर संशय आला. त्याने भारतीचा मोबाइल तपासला. ज्यात काही फोटो, चॅट आणि व्हॉईस मेसेज मिळाले. ज्यानंतर सुरेशने पोलीस ठाणं गाठलं आणि भारती विरोधात तक्रार दाखल केली. केलामंगलम पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोघींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी भारती आणि तिची लेस्बियन पार्टनर सुमित्राला अटक केली आहे. या दोघींचे प्रेमसंबंध मागील तीन वर्षांपासून होते अशीही माहिती पोलिसांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृ्त्त दिलं आहे.
