Dead Economy Statement Of Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारत आणि रशियाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधून मोठा वाद निर्माण केला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आणि दंडाची घोषणा केली आहे. तर भारताने ट्रम्प यांना चोख प्रत्युत्तर देत म्हटले आहे की भारत जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. दुसरीकडे, रशियानेही ट्रम्प यांना उत्तर दिले आहे.
धमक्यांकडे दुर्लक्ष करू नये
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ट्रम्प यांनी ज्यांना ते “मृत” म्हणतात, त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करू नये. मृत अर्थव्यवस्थेवरील ट्रम्प यांच्या टिप्पणीला त्याच भाषेत उत्तर देताना, रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष मेदवेदेव यांनी ट्रम्प यांना रशियाच्या अणु क्षमतेची आठवण करून दिली.
मेदवेदेव यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिले की, “जर अमेरिकेचे तथाकथित शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या काही शब्दांनी इतके घाबरले असतील, तर रशिया सर्वकाही व्यवस्थित करत आहे आणि आपल्या मार्गावर चालत राहील.”
‘डेड हँड’ लक्षात ठेवा
भारत आणि रशियाच्या ‘मृत अर्थव्यवस्था’ या विधानावर प्रतिक्रिया देताना मेदवेदेव म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी द वॉकिंग डेड वरील त्यांचे आवडते चित्रपट लक्षात ठेवावेत आणि ‘डेड हँड’ किती धोकादायक असू शकते, हे लक्षात ठेवावे.”
येथे ‘डेड हँड’ द्वारे, मेदवेदेव यांचा अर्थ सोव्हिएत अणु प्रतिबंधक प्रणाली “परिमीटर” असा होता. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनवर हल्ला झाल्यास प्रत्युत्तरात्मक हल्ला करण्यासाठी ही स्वयंचलित प्रणाली तयार करण्यात आली होती.
शाब्दिक युद्ध
यापूर्वीही गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प आणि मेदवेदेव यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी युक्रेनवर हल्ला थांबवण्यासाठी रशियाला १० ते १२ दिवसांचा अल्टिमेटम देण्याची घोषणा केली होती, त्यानंतर माजी रशियन राष्ट्राध्यक्ष संतापले. ट्रम्प यांच्या घोषणेला उत्तर देताना ते म्हणाले की, ट्रम्प यांनी हे लक्षात ठेवावे की प्रत्येक नवीन अल्टिमेटम हा धोका असतो. उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, मेदवेदेव हे एक अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते मर्यादा ओलांडत आहेत.