Jagan Mohan Reddy Cancels Tirupati Temple Visit : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसंच, सत्ताधाऱ्यांकडून ते टीकेचे धनी बनले आहेत. चोहोबाजूने त्यांच्यावर टीका होत असताना जगन मोहन रेड्डी यांनी २८ सप्टेंबर रोजी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात जाण्याचे नियोजन केले होते. परंतु, सत्ताधारी पक्षाने त्यांच्याविरोधात निदर्शने केली. तर पोलिसांनीही त्यांना नोटीस बजावली. अखेर त्यांनी मंदिरात जाण्याचे नियोजन आता रद्द केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

जगन मोहन रेड्डी यांनी मंदिरात जाण्यापूर्वी त्यांचा धर्म जाहीर करावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. या मागणीला जोर आल्याने जगन मोहन रेड्डी यांनी हा दौराच रद्द केला. “आंध्र प्रदेश रेव्हेन्यू एंडोमेंट्स, नियम १६ आणि TTD जनरल रेग्युलेशन नियम १३६ नुसार गैर-हिंदूंनी दर्शनापूर्वी वैकुंटम रांग संकुलात धर्माबाबत घोषणा सादर करणे आवश्यक आहे”, असं आंध्र प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दग्गुबती पुरंदेश्वरी यांनी सांगितले.

हेही वाचा >> Tirupati Ladoo: हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणात कशी आली?

“आम्हाला समजले आहे की जगन मोहन रेड्डी या महिन्याच्या २८ तारखेला तिरुमलाला भेट देण्याचा विचार करत आहेत. तिरुमलामध्ये अनेक दशकांपासून धर्म जाहीर करण्याची प्रथा प्रचलित आहे. एपी रेव्हेन्यू एंडोमेंट्स १ च्या GO MS NO-311 नुसार , नियम क्रमांक १६, गैर-हिंदूंनी वैकुंठम रांग संकुलात दर्शनापूर्वी एक धर्माबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. भाजपाची मागणी आहे की जगन रेड्डी यांनी तिरुमला आरोहण सुरू करण्यापूर्वीच त्यांनी घोषणापत्र द्यावे.”

“टीटीडी (तिरुमला तिरुपती देवस्थानम) आणि मंदिराच्या आध्यात्मिक पावित्र्याला कलंक लावल्याबद्दल जगन यांनी आधी सर्व हिंदूंची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. ते भगवान बालाजीचे दर्शन घेणार आहेत. त्याला कोणीही रोखू शकत नाही, परंतु जेव्हा ते तिरुपती तिरुमलामध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांनी घोषणापत्र द्यावं. हे सर्व गैर-हिंदूंनी केले पाहिजे”, असं भाजपा नेते लंका दिनाकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे तर राजकीय षडयंत्र

वायएसआरसीपीचे माजी आमदार आणि टीटीडी बोर्डाचे माजी अध्यक्ष भूमना करुणाकर रेड्डी यांनी प्रत्युत्तर दिले, “जगन यांनी यापूर्वी अनेकदा मंदिराला भेट दिली आहे आणि अनेक धार्मिक विधींमध्ये भाग घेतला आहे. त्यांना आता डिक्लेरेशन फॉर्म भरण्याची काय गरज आहे? त्यांची बदनामी करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे.”