दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सोन्याच्या तस्करीचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दोन अर्भकांच्या डायपर्समधून प्रत्येकी १ किलोचे अशी सोन्याची १६ बिस्किटे जप्त करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, काल सकाळी सात वाजता दुबईहून दिल्ली विमानळावर उतरलेल्या विमानातून सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन अर्भकांचाही समावेश होता. हे सहाजणही सुरत येथील रहिवाशी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ते दोन वेगवेगळ्या गटात प्रवास करत होते. विमानतळावर आल्यानंतर या सहाजणांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. यावेळी दोन अर्भकांच्या डायपर्समध्ये ४.२८ कोटी रूपये किंमतीची सोन्याची १६ बिस्किटे मिळाली. हे प्रत्येक बिस्कीट एक किलोचे असल्याची माहिती कस्टम विभागाचे आयुक्त एस. आर. भरूआ यांनी दिली. या प्रवाशांची चौकशी केली असता त्यांना सोन्याच्या बिस्किटांबद्दल समाधानकारक कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण सादर करता आले नाही. या सर्व प्रवाशांना कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आल्याचेही भरूआ यांनी सांगितले.

मात्र, हा सर्व प्रकार पाहून कस्टम विभागाचे अधिकारीही काही वेळासाठी चक्रावून गेले. सोन्याची तस्करी करण्याची ही नवीनच पद्धत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  अटक करण्यात आलेले कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून दुबईत वास्तव्याला आहे. दुबईत त्यांना चांगले उत्त्पन्नही मिळते. दरम्यान, या प्रवाशांची चौकशी केली असता आपण गुंतवणुकीसाठी सोन्याची बिस्किटे आणल्याचे सांगितले. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या सर्वांना मंगळवारी पातियाळा उच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कस्टम विभागाने विमानतळावर जानेवारीपासून केलेल्या कारवाईत आतापर्यंत २०० किलो सोने जप्त केले आहे.