दिल्लीत एका तांत्रिकाने महिलेला नग्नावस्थेतील फोटो पाठवायला सांगितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बाबाविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
दक्षिण दिल्लीतील एका ग्रंथालयात काम करणाऱ्या ३२ वर्षीय महिलेचे लग्न होत नव्हते. चार महिन्यांपूर्वी तिला तंत्रविद्येची माहिती असलेल्या एका बाबाबद्दल माहिती मिळाली. महिला आणि तिची आई बाबाला कुंडली दाखवण्यासाठी गेले. पुजा केल्यानंतरच या समस्येवर तोडगा निघेल, असे त्या बाबाने सांगितले होते. ठरल्यानुसार महिलेने पुजाअर्चना केली. काही दिवसांनी बाबाने महिलेला फोन केला. सुरुवातीला त्याने महिलेला तळहाताचा फोटो पाठवायला सांगितला. तुझ्यावर कोणीतरी ‘काळी जादू’ केली असून यातून तुझी सुटका करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, असे त्याने महिलेला सांगितले. यानंतर बाबाने वारंवार महिलेला फोन करुन तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. फोनवरुन बाबाने महिलेशी अश्लील संवाद साधायला सुरुवात केली. तूला कोणी स्पर्श केला तर तू काय करशील?, तुझा प्रियकर होता का?, असे प्रश्न तो बाबा विचारु लागला. महिलेने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तो बाबा यावरच थांबला नाही. त्याने महिलेला नग्नावस्थेतील फोटो पाठवायला सांगितले. हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने थेट वसंत विहार पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
कुटुंबीयांना न सांगताच मी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मी आधी कुटुंबीयांना सांगितलं असते तर त्यांनी मला तक्रार दाखल करु दिली नसती. त्या विकृत बाबाला धडा शिकवण्यासाठीच मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, असे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले.