संपूर्ण देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशातच दिल्ली राजधानीतही करोना रुग्णांची स्थिती भयावह आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या, त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर येणारा ताण, त्याचबरोबर औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्या दिल्लीकरांपुढे आहेत. त्यात आता दिल्लीचे भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतल्या औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार सरकारच करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणतात, “दिल्लीतले लोक केवळ श्वासासाठी लढत आहेत, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारख्या इतरही संघटना लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दिल्ली सरकारचे मंत्री आणि आमदार हे औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. दिल्लीमधल्या सध्याच्या या संकटाला दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं जबाबदार आहे.”


दिल्लीतली परिस्थिती लक्षात घेता तिथे गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाउन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाउन संपणार होता. मात्र करोना स्थिती पाहता हा लॉकडाउन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता १७ मेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. या आठवडाभराच्या लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi bjp chief adesh gupta said that delhi government and mlas are involved in black marketing vsk
First published on: 09-05-2021 at 15:44 IST