भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात दिल्लीतील वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. हर घर तिरंगा मोहिमेसाठी मनोज तिवारी हे दिल्लीतील बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मात्र या रॅलीदरम्यान त्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घातलेलं नव्हतं. तिवारी हे हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला. तिवारी यांना वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे तिवारी हे ज्या व्यक्तीची दुचाकी चालवत होते त्या दुचाकी मालकालाही दंड ठोठावण्यात आला.

तिवारींसहीत भाजपाचे अनेक खासदार हे लाल किल्ला ते नवीन दिल्लीमधील संसद भवनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली. याच रॅलीदरम्यान तिवारी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसले.

यानंतर तिवारी यांनी ट्विटरवरुन आपण हा दंड भरणार असल्याचं म्हटलंय. “आज मी हेल्मेट घालतं नाही याबद्दल माफी मागतो. दिल्ली वाहतूक पोलिसांना मी सांगू इच्छितो की मी सर्व दंड भरणार आहे. या फोटोंमध्ये गाडीची नंबर प्लेट दसत असून तो लाल किल्ल्याजवळ काढण्यात आलाय. कोणीही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नये अशी मी विनंती करतो. सुरक्षितपणे वाहन चालवा. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला तुमची गरज आहे,” असं ट्विट तिवारी यांनी केलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्ही चालकाला दंड ठोठावला आहे. एकूण २१ हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. तसेच या गाडीच्या मालकालाही दंड ठोठावण्यात आला असून पीयूसी प्रमाणपत्र, एसएसआरपी आणि इतर नियमांचं उल्लंघन असा एकूण २० हजारांचा दंड दुचाकीच्या मालकाला ठोठावण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते सुमन नालवा यांनी दिली.