दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची बदनामी प्रकरणी माफी मागितली. केजरीवालांसह ‘आप’ नेते संजय सिंह, राघव चढ्ढा, आशुतोष या तिघांनीही जेटलींची माफी मागितली. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) प्रकरणात केलेल्या आरोपांवरुन केजरीवालांनी माफी मागितली. दगडी चाळमधल्या चुकीला माफी नाही, या मकरंद देशपांडेच्या तोंडी असलेला अरुण गवळीचा डायलॉग प्रचंड गाजला होता. मात्र, केजरीवालांना माफ करत चुकीला माफी आहे, असा नवा पायंडा ‘अरुण’ जेटलींनी पाडला.

यापूर्वी केलेल्या बेछूट आरोपांमधून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यावर सपशेल माफीनाफ्याची वेळ ओढावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची लेखी माफी मागितल्यानंतर सोमवारी केजरीवाल व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी अरुण जेटली यांची माफी मागितली.

केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रक काढून जेटलींची माफी मागितली. यात केजरीवाल जेटलींना उद्देशून म्हणतात, तुम्ही डीडीसीएच्या अध्यक्षपदी असताना डिसेंबर २०१५ मध्ये मी तुमच्यावर काही आरोप केले होते. काही लोकांनी मला ती माहिती दिली होती. मात्र, ती माहिती चुकीची असून आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

या आरोपांमुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल मी माफी मागतो, असेही त्यांनी म्हटले आहे. जेटलींनी केजरीवालांविरोधात १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी माफी मागून हा खटला सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर अरुण जेटली खटला मागे घेणार असून हे प्रकरण आता संपल्यात जमा आहे.