सोमवारी नवी दिल्लीतील गोकुलपुरी परिसरात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या सूनेला ताब्यात घेतले होते. दरम्यान, याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूनेनेच प्रियकराच्या मदतीने सासू सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचं पुढे आलं आहे. मोनिका असं आरोपी महिलेचा नाव असून आशिष असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. आशीष सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
हेही वाचा – Karnataka : ‘हिजाब’चा वाद निर्माण करणाऱ्या ओबीसी नेत्याला भाजपाकडून उमेदवारी, विद्यमान आमदाराचे तिकीट कापले!
नेमकं काय आहे प्रकरण?
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी गोकुलपुरी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या मुलाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. हल्लेखोरांनी घराचा दरवाजा न तोडता घरता प्रवेश घेतल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे पोलिसांचा घरातील व्यक्तींवर संशय होता. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याची सून आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांनी सुरुवातील मोनिकाची चौकशी केली. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तर दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता, तिने आशिष नावाच्या व्यक्ती वारंवार संभाषण केल्याचं पुढे आलं. पोलिसांनी याबाबत विचारलं असता आशिष आपला प्रियकर असून त्याच्या मदतीने सासू सासऱ्याची हत्या केल्याची कबुली तिने दिली.
हेही वाचा- उंदराच्या हत्येप्रकरणी तरुणाच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून आरोपपत्र दाखल, नेमकं प्रकरण काय?
तीन वर्षांपूर्वी झाली होती दोघांची ओळख
मोनिकाची २०२० मध्ये सोशल मीडियावर आशिषशी ओळख झाली होती. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मोनिका विवाहित असूनही आशिषला भेटण्यासाठी हॉटेलला जायची. दोघं फोनवरू संवाद साधायचे. दरम्यान, एक दिवस त्यांच्या या प्रेमप्रकरणाची माहिती मोनिकाच्या पतील मिळाली. त्याने तिचा मोबाईल तपासला असता त्याला दोघांचे संभाषण दिसलं. त्यानंतर त्याने तिला घरातून बाहेर जाण्यास मनाई केली आणि तिला साधा फोन घेऊन दिला. तसेच सासू सासऱ्याला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यामुळे तिला आशिषला भेटता येत नव्हते. अखेर गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी या दोघांना वाटेतून हटवण्याचं षडयंत्र रचलं.
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
यासाठी दोघांनी नवीन सिम कार्ड घेतले. त्यावरून दोघे एकमेकांशी बोलत होते. घटनेच्यादिवशी संध्याकाळी ७ वाजता आशिष त्याच्या साथीदारासह मोनिकाच्या घरी दाखल झाला. मोनिकाने घरचा दरवाजा उघडून त्यांना आत घेतले. त्यानंतर दोघे घरच्या छतावर लपले. रात्री १०.३० वाजता सर्वजण त्यांच्या खोलीत झोपायला गेले, तेव्हा आशिषने मोनिकाच्या नव्या नंबरवर फोन करून तिला खोलीतून बाहेर पडू नको, असे सांगितले. आशिष आणि त्याच्या साथीदाराने मिळून मोनिकाच्या सासू सासऱ्याची हत्या केली. तसेच हत्येचा संशय येऊ नये म्हणून काही वस्तूही चोरून नेल्या. सोमवारी सकाळी मोनिकाचा पती जेव्हा बाहेर आल्यानंतर त्याला आईवडिलांची हत्या झाल्याचं समजलं.