एक्स्प्रेस वृत्त

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेल्या स्फोटात मोटार चालवणारा आरोपी डॉ. उमर नबी याच्या जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कोईल या गावी असलेल्या घरावर हातोडा चालविण्यात आला. उमरचे पालक, भाऊ आणि मेहुणी आदी लोक या दुमजली घरात राहत होते. या सर्वांना बाहेर काढल्यानंतर गुरुवारी रात्री घरावर कारवाई करण्यात आल्याचे पुलवामा येथील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी सांगितले.

दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमधील आरोपींच्या घरांवर यापूर्वी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार जप्तीची कारवाई करण्यात येत होती. परंतु एप्रिलमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील आरोपींची घरे पाडण्यास सुरुवात झाली. २४ एप्रिल रोजी सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित आरोपी आदिल अहमद ठोकर याच्या बिजबेहरा येथील घरावर कारवाई केली होती. त्यानंतर तीन दिवसांनी सुरक्षा दलांनी ९ अन्य दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली होती.

डॉ. उमर हा फरिदाबादमधील धौज येथील अल फलाह विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर’मध्ये कार्यरत होता. विद्यापीठातून डॉ. मुझम्मिल अहमद गनी आणि डॉ. शाहीन शाहिद अन्सारी यांना स्फोटाच्या काही दिवस आधी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी अद्याप कारवाईबाबत कोणतेही औपचारिक निवेदन जारी केलेले नाही.