Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने वादग्रस्त उदयपूर फाईल्स : कन्हैया लाल टेलर मर्डर या सिनेमावर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. इस्लामी धर्मगुरुंची संघटना असलेल्या जमीयत उलेमा ए हिंदी आणि इतर याचिकाकर्त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ (CBFC) द्वारा न्यायालयात धाव घेतली होती. आता या प्रकरणी केंद्राने निर्णय घ्यावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.
काय म्हटलंय न्यायालयाने?
केंद्र सरकारकडून याचिकाकर्त्यांच्या याचिकेबाबत जोपर्यंत अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करु नये असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष अरशद मदानी यांनी आणि इतर याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे आणि केंद्र सरकारने तोडगा काढावा असं न्यायालयाने म्हटलं आहे.
उदयपूर फाईल्स हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित
उदयपूरचा टेलर कन्हैया लालची २०२२ मध्ये हत्या झाली. उदयपूर फाईल्स याच घटनेवर आधारित आहे. शुक्रवारी म्हणजेच ११ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटावर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. जमीयत उलेमा ए हिंद आणि इतर याचिकाकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली होती. कन्हैया लाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी मोहम्मद जावेद याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही, आज दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटावर बंदी घातली आहे. Live Law ने हे वृत्त दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
उदयपूरमध्ये टेलरिंगचं (शिवणकाम) काम करणाऱ्या कन्हैयालाल यांची जून २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कन्हैयालाल यांनी या वक्तव्याचं समर्थन करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यामुळे मोहम्मद रियाज व मोहम्मद गौस या दोघांनी मिळून कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात इतरही काहीजण सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. ‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणारा जावेदही या हत्या प्रकरणातील एक आरोपी आहे.