मध्य दिल्लीतील हौज काझी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ६५ वर्ष वय असलेल्या आईवर तिच्या ३९ वर्षीय मुलाने दोन वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुलाला अटक करण्यात आली आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, विवाहबाह्य संबंधाचा संशय व्यक्त करून मुलाने शिक्षा देण्याच्या नावाखाली अत्याचार केला.

या महिन्याच्या सुरुवातीला धार्मिक तीर्थयात्रेवरून तक्रारदार आणि तिचे कुटुंब परतले होते. त्यानंतर मुलाकडून सदर अश्लाघ्य प्रकार झाला. यानंतर पीडितेने २५ वर्षीय मुलीसह शुक्रवारी हौज काझी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, पीडित महिला तिचा निवृत्त सरकारी कर्मचारी पती, आरोपी मुलगा आणि मुलीसह हौज काझी परिसरात राहते. या कुटुंबाला आणखी एक मोठी मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. तीही याच परिसरात राहते. १७ जुलै रोजी पीडिता, तिचा पती आणि मुलगी सौदी अरेबियात तीर्थयात्रेसाठी गेले होते. आठ दिवसानंतर ते विदेशात असताना आरोपी मुलाने वडिलांना फोन करून भारतात परतण्यास सांगितले.

तक्रारीत केला धक्कादायक दावा

पीडितेने तक्रारीत पुढे धक्कादायक दावा केला. “माझ्या पतीने मला घटस्फोट द्यावा, यासाठी मुलगा वडिलांवर दबाव टाकत होता. त्याने म्हटले की, तो लहान असताना तिसऱ्या मुलीचा जन्म होण्यापूर्वी माझे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली आहे.” हाच तगादा लावण्यासाठी मुलाने विदेशात असताना वडिलांना वारंवार फोन केला.

या सततच्या संतापजनक कॉलमुळे कुटुंबीय १ ऑगस्ट रोजी दिल्लीला परतले. घरी परतल्यानंतर आरोपी मुलाने आईवर हल्ला केला. “त्याने माझा बुरखा फाडला आणि मला एका खोलीत बंद करून मारहाण केली. त्याने माझ्या पतीला सांगितले की, त्यांनी मला बिघडवले आहे”, असा दावा पीडितेने पोलीस तक्रारीत केला आहे.

भूतकाळात केलेल्या चुकांसाठी बलात्कार

यासंबंधी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच दिवशी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास इतर कुटुंबियांना सांगितले की, त्याला एकांतात आईशी बोलायचे आहे. यानंतर मुलाने आईला एका खोलीत बंद करून तिच्यावर बलात्कार केला. आईने भूतकाळात केलेल्या चुकांची शिक्षा तो तिला देत आहे, अशी सबब मुलाने सांगितली.

या घटनेनंतर जबर मानसिक धक्का बसलेली आई घाबरून मुलीच्या खोलीत झोपू लागली. तसेच लोकलज्जेखातर या घटनेची तक्रार केली नाही. मात्र गुरूवारी आरोपीने पहाटे ३.३० वाजता पुन्हा एकदा स्वतःच्या आईवर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडितेने धाकट्या मुलीला सर्व काही सांगितले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.