पीटीआय, नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या (एमसीडी) महापौरपदाची निवडणूक  लांबणीवर पडल्याप्रकरणी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. ही निवडणूक लवकर घेण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या (आप) महापौरपदाच्या उमेदवार शेली ओबेरॉय आणि इतरांनी याचिकेत केली आहे.

‘आप’च्या वकिलांची याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने मान्य केली. सरन्यायाधीशांनी सांगितले, की हे प्रकरण बुधवारी आपण सुनावणीसाठी सूचिबद्ध करू. सोमवारी दिल्ली महापौरपदाची निवडणूक तिसऱ्यांदा स्थगित झाल्यानंतर संतप्त झालेल्या ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केली होती. भाजप व आप या दोन्ही पक्षांनी महापौरपदाच्या निवडणुका रोखल्याचा आरोप एकमेकांवर केला आहे.

ओबेरॉय यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दिल्ली महापौरपदाची निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश देण्याची विनंती केली होती. मात्र, ६ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक पाहता ही याचिका मागे घेण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वादाचा मुद्दा काय?

नामनिर्देशित ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती व सभागृहात त्यांचा मतदानाचा हक्क, हा दोन्ही पक्षांतील वादाचा मुख्य मुद्दा आहे. २५० सदस्यांच्या दिल्ली महापालिकेत ‘आप’चे १३४ सदस्य निवडून आले आहेत. ‘आप’ला बहुमत आहे. मात्र नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन भाजप आपले बहुमत हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.