Delhi Minister On Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेत विजय मिळवल्यानंतर, भाजपाने काल आपला मुख्यमंत्री घोषित केला. काल संध्याकाळी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपाने एकमताने रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. यानंतर, रेखा गुप्ता यांनी आज सकाळी ११ वाजता रामलीला मैदानावर ६ मंत्र्यांसह शपथ घेतली. यामध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांचेही नाव आहे. दरम्यान मंत्री म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर लगेचच, मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट टीका करत, “केजरीवाल यांना त्यांचा बहुतांश काळ तुरुंगात घालवावा लागेल”, असे म्हटले होते.

आज दिल्लीचे मंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी सिरसा यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानले आणि म्हटले की, “पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करणाऱ्या टीमचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. दिल्लीला स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा मिळेल. आम्ही भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई करू आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांचा बहुतांश वेळ तुरुंगात घालवावा लागेल.”

कोण आहेत मनजिंदर सिंग सिरसा?

मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीतील राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी अकाली दलाच्या तिकिटावर दोनदा आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यांनी २०१३ आणि २०१७ मध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०२१ मध्ये मनजिंदर सिंग सिरसा यांनी अकाली दल सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, सिरसा २०२३ पासून भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मनजिंदर सिंग सिरसा यांनी आपच्या विद्यमान आमदार धनवती चंडेला यांचा १८१९० मतांनी पराभव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. यामध्ये भाजपाने आम आदमी पक्ष आणि केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनतर दिल्लीची सत्ता भाजपाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट झाले होते. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.