Delhi Patiala House Court Judge Late Night Hearing: दिल्लीच्या एका न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) पहाटे २:२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेतली. त्यामुळे या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील एका आरोपीला १४ दिवसांच्या कोठडी देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, पटियाला हाऊस न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेफाली बर्नाला टंडन यांच्यासमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीवेळी बचाव पक्षाचे वकील देखील उपस्थित होते.
न्यायमूर्तींनी आरोपी स्वराज सिंह यादव यांना त्यांच्या वडिलांना वकिलाची व्यवस्था करून देण्यासाठी फोन करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर पहाटे ३:०५ वाजता वकील न्यायमूर्तीच्या घरी पोहोचले. न्यायालयाने पुढे आरोपी यादव आणि त्यांच्या वकिलाला खाजगीत चर्चा करण्यासाठी २० मिनिटे दिली आणि अखेर पहाटे ३:३० वाजता खटल्याची सुनावणी सुरू केली.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्तींनी सकाळी ६:१० वाजता आदेश दिला. त्यांनी ईडीचा अर्ज स्वीकारला आणि आरोपी यादव यांना १४ दिवसांसाठी कोठडीत पाठवले. आरोपी यादव यांना आता २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.
गुरुग्राम येथील रिअल इस्टेट फर्म ओशन सेव्हन बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक स्वराज सिंह यादव यांना १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५० वाजता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खरेदीदारांकडून गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या आणि मनी लाँड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वाटप केलेले फ्लॅट स्वराज सिंह यादव यांनी फसवणूक करून रद्द केले आणि ते फक्त रोख रकमेच्या स्वरूपात चढ्या किमतीत पुन्हा विकले. ईडीचे म्हणणे आहे की, आरोपी यादव यांनी शेल कंपन्यांद्वारे आणि एस्क्रो खात्यांचा गैरवापर करून अंदाजे २२०-२२२ कोटी रुपये लुटले आहेत. ईडीचा असा दावा आहे की, आरोपी यादव यांनी कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपली वैयक्तिक आणि कंपनीची मालमत्ता घाईघाईने विकली.
