पीटीआय, नवी दिल्ली

भारताचे सार्वभौमत्व विस्कळीत करण्यासाठी आणि देशाविरोधात असमाधानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी चीनकडून मोठय़ा प्रमाणात निधी घेतला असा गंभीर आरोप ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाविरोधात दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. ‘न्यूजक्लिक’विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) एफआयआर नोंदवण्यात आला आहे.‘न्यूजक्लिक’चे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ यांनी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलारिझम (पीएडीएस) या समूहाबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान निवडणूक प्रक्रियेत घातपात करण्याचा कट रचला असा आणखी एक गंभीर आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवला आहे.

दिल्ली पोलिसांनी ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाविरोधात नोंदवलेल्या एफआयआरची प्रत त्यांना शुक्रवारी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामध्ये दिल्ली पोलिसांनी केलेल्या आरोपांनुसार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रचार विभागाचा सक्रिय सदस्य नेव्हिल रॉय सिंघम याच्यामार्फत हा परदेशी निधी फसवणुकीच्या मार्गाने ‘न्यूजक्लिक’ला देण्यात आला.हा कट पुढे नेण्यासाठी शाओमी, विवो, इत्यादींसारख्या महाकाय चिनी दूरसंचार कंपन्यांनी भारतामध्ये बेकायदा पद्धतीने निधीपुरवठा करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), परकीय चलन व्यवस्थापन कायदा (एफईएमए) यांच्या नियमांचे उल्लंघन करून भारतामध्ये हजारो शेल कंपन्या सुरू केल्या, असे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>>राजस्थान, मध्य प्रदेश सरकारला मोफत लाभप्रकरणी नोटीस

पूरकायस्थ यांनी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्याबरोबर गुलाम नबू फई या आयएसआय एजंटसह संगनमत करून देशविरोधी कारवाया केल्या असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. पूरकायस्थ, नवलखा आणि नेव्हिलच्या स्टारस्ट्रीम या शांघाय-स्थित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना केलेल्या मेलमध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचा भाग नसल्याचे दाखवण्याचा कट रचला. तसेच कोविड-१९ महासाथीला आळा घालण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांची बदनामी करण्यासाठी खोटे कथन रचले असे इतर आरोप दिल्ली पोलिसांनी ठेवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पेड न्यूज’चा दावा

भारताचे सार्वभौमत्व विस्कळीत करणे आणि देशाविरोधात असमाधानाचे वातावरण निर्माण करणे हा कट पुढे नेण्यासाठी चीनमधून आडवळणाने आणि छुप्या पद्धतीने मोठय़ा प्रमाणात निधी वळवण्यात आला आणि जाणीवपूर्वक ‘पेड न्यूज’ देण्यात आल्या. त्याद्वारे देशांतर्गत धोरणे, भारताचे विकास प्रकल्प यांच्यावर टीका करण्यात आली आणि चीन सरकारची धोरणे व कार्यक्रमांचा प्रचार, प्रसार आणि बचाव करण्यात आला असा आरोप दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे.