scorecardresearch

…अन् एका फोन कॉलमुळे दंगलीतील फरार आरोपी पोलिसांना सापडला, कॉन्स्टेबलची हत्या आणि ५० पोलिसांना जखमी केल्याचा आरोप

हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांची फेब्रुवारी २०२० मध्ये हत्या करण्यात आली होती

…अन् एका फोन कॉलमुळे दंगलीतील फरार आरोपी पोलिसांना सापडला, कॉन्स्टेबलची हत्या आणि ५० पोलिसांना जखमी केल्याचा आरोप
हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांची फेब्रुवारी २०२० मध्ये हत्या करण्यात आली होती

“माझं घर ठीक आहे का? पोलिसांनी ते पाडलं तर नाही ना किंवा इतर कोणी ताब्यात घेतलंय का?” शेजाऱ्याला केलेल्या या एका फोनमुळे दोन वर्षांनी आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. २०२० मध्ये दिल्लीमधील झालेल्या दंगलीत एका हेड कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. तसंच ५० हून अधिक पोलिसांना जखमी केल्याचाही आरोप आहे. पोलीस गेल्या दोन वर्षांपासून फारर झालेल्या या आरोपीचा शोध घेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद वसीम असं या आरोपीचं नाव आहे. आपली ओळख बदलत तो उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी वास्तव्य करत होता. वसीमने या काळात आपल्या कुटुंबाशी कोणताही संपर्क साधला नव्हता. यादरम्यान त्याचं कुटुंबही दिल्लीत वास्तव्यास गेलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीमवर कट आखल्याचा, क्रूड बॉम्ब बनवल्याचा आणि त्याच्या सहाय्याने पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दंगल तसंच हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या हत्येप्रकरणी २२ जणांना अटक केली होती. पण वसीम आणि त्याचे चार सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्याने आपला फोनही नष्ट केला होता.

हेही वाचा – गुजरातमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात तुफान दगडफेक, सहाजण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घरांवर क्रूड बॉम्ब ठेवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन लाल आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला तेव्हा वसीम इतर सहकाऱ्यांसोबत मैदानातच उपस्थित होता. आंदोलक मोठ्या संख्येने पोलिसांच्या दिशेने वाटचाल करत होते. दुसरीकडे स्थानिक त्यांच्या घरांच्या दिशेने धावत होते.

सीएएविरोधातील आंदोलनानंतर २४ फेब्रुवारी २०२० मध्ये दंगल उसळली होती. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये आयबी अधिकारी अंकित शर्मा आणि रतन लाल यांचाही समावेश होता. पाच दिवसांमध्ये ५५० लोक जखमी झाले होते. पोलिसांनी एकूण ७५८ गुन्हे दाखल केले होते आणि २५०० जणांना दंगल, हत्या, चोरी, मारहाण, गुन्हेगारी कट अशा अनेक कलमांखाली अटक केली होती.

राजधानीत आंदोलन उग्र होत असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकारी अमित शर्मा आणि अनुज कुमार यांनी चांद बाग परिसरात तैनात करण्यात आलं होतं.

“आंदोलकांकडे लाठी, शस्त्र, सळई, तलवारी, दगडं, पेट्रोल बॉम्ब होते. पोलिसांनी आंदोलकांना मागे वळण्यास सांगितलं होतं. पण आंदोलकांना नकार देत आणखी हिंसक झाले. ५० हून अधिक पोलीस कर्मचाऱी यावेळी जखमी झाले होते,” अशी माहिती विशेष पोली, आयुक्त रवींद्र सिंग यादव यांनी दिली आहे.

अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की “घटनास्थळाच्या व्हिडीओमध्ये हिंसक जमाव डीसीपी शर्मा यांच्यावर काठी आणि इतर शस्त्राने हल्ला करत असल्याचं दिसत आहे. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. आंदोलक पोलिसांवर दगडफेक करत होते”.

“कॉन्स्टेबल लाल यांनीदेखील आंदोलकांनी घेरलेल्या शर्मा आणि कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते गंभीर जखमी झाले आणि मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शर्मा आणि कुमार यांच्यावरही सर्जरी करण्यात आली,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे १०० हून अधिक फोटो तपासण्यात आले. यावेळी अनेकांची ओळख पटवण्यात आली होती. फोनमधील व्हिडीओचीही मदत घेण्यात आली. यानंतर एकूण २२ जणांना अटक कऱण्यात आली.

जे पाच आरोपी फरार झाले होते त्यामध्ये वसीमदेखील होता. पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं होतं. अखेर दोन वर्षांनी पोलिसांनी वसीमला अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या