Caught While Taking Bribe Cop Throws Money In Air: दिल्लीतील हौज काझी पोलीस ठाण्याबाहेर एक नाट्यमय घटना घडली असून, १५ हजारांची लाच स्वीकारताना दिल्ली पोलिसांच्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या उपनिरीक्षकाला आपण जाळ्यात अडलो असल्याचे लक्षात येताच त्याने लाच म्हणून स्वीकारलेले पैसे हवेत फेकले आणि घटनास्थळावरून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये त्याला यश आले नाही. असे असले, तरी घटनास्थळी असलेले बघे हवेत उडवलेले पैसे घेऊन पसार झाले. या घटनेतील आरोपी उपनिरीक्षकाचे नाव राकेश कुमार असे आहे. याबाबत द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
ही घटना काल (मंगळवारी) हौज काझी पोलीस ठाण्याबाहेर घडली. आरोपी राकेश कुमार रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारत होता. यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आपल्या मागावर आहे हे लक्षात येताच आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने १५,००० रुपये हवेत फेकले. यामध्ये ५०० रुपयांच्या ३० नोटा होत्या. या नोटा रस्त्यावर विखुरल्यानंतर काही वेळातच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी नोटा उचलण्यासाठी धाव घेतली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी १०,००० रुपयांच्या नोटा गोळा केल्या, परंतु उर्वरित पाच हजार रुपये रस्त्यावरील लोक घेऊन गेले.
या प्रकारानंतर, आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी हौज काझी येथील एका रहिवाशाने पोलिसांकडे तक्रार दाखल करत आरोप केला होता की, पोलीस उपनिरीक्षक राकेश कुमार यांनी खोट्या प्रकरणात अडकवू नये म्हणून लाच मागितली आहे. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि सांगितले की सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश कुमार यांनी दुपारी १२.३० वाजता हौज काझी पोलिस ठाण्यात लाच देण्यासाठी बोलावले आहे. त्यानंतर आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “दुपारी १२.३० च्या सुमारास तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. काही वेळाने तक्रारदार आणि आरोपी उपनिरीक्षक पोलीस ठाण्याबाहेर आले. ते बाहेर येताच तक्रारदाराने लाच प्रतिबंधक पथकाला इशारा दिला आणि लाचेची रक्कम दिल्याचे सांगितले. जसे लाच प्रतिबंधक पथकाचे सदस्य आरोपीला पकडण्यासाठी धावले, तसे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने नोटा हवेत फेकल्या.”