Delhi Red Fort Car Blast Updates : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच १२ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते.

तसेच या संपूर्ण घटनेचा आढावा घटनास्थळी जाऊन गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घेतला. या घटनेचा आता पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील स्फोटाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांमध्ये मोठा आरडाओरडा आणि गोंधळ झाल्याचा एक थराराक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्फोटाची घटना घडली तेव्हा झालेल्या स्फोटाचा आवाजही ऐकायला मिळत आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

व्हिडीओमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोक आरडाओरडा करत पळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती (कदाचित व्लॉगर) दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधत (मुलाखत) असल्याचं दिसत आहे. मात्र, त्याच क्षणी एक शक्तिशाली स्फोट झाल्याचा आवाज व्हिडीओत येत आहे आणि त्यानंतर पळा-पळा असा माणसांचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे. तसेच व्हिडीओमध्ये स्फोटानंतर घटनास्थळी झालेला गोंधळ दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, लोकसत्ता स्वतंत्रपणे व्हिडीओची पडताळणी करत नाही.

दरम्यान, दिल्ली वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सकाळी येथील वाहतुकीसंदर्भात महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नेताजी सुभाष मार्गावरील आणि सर्व्हिस रोड दोन्हीवर वाहतूक वळवण्यात आली आहे. पोलिसांनी म्हटलं की, “प्रवाशांना पुढील सूचना मिळेपर्यंत सकाळी ६ वाजल्यापासून या मार्गांवरून प्रवास टाळण्याचा आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे,” असं दिल्ली वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.