Fact Check On Delhi Blast : दिल्लीमधील लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून इतर १२ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दिल्लीत मोठी खळबळ उडाली. या स्फोटाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, दिल्ली स्फोटांशी संबंधित फोटो असल्याचे भासवून काही बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पीआयबी (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) फॅक्ट चेकने एक्सवर पोस्ट शेअर करत सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दिल्लीतील घटनेच्या संदर्भातील फोटो शेअर करण्यापूर्वी विश्वासार्ह किंवा अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून माहिती पडताळून पाहण्याचं आवाहन केलं आहे.

पीआयबीने एक्सवर काही पोस्ट शेअर केले असून त्यामध्ये काही सोशल मीडिया अंकाऊटवर बनावट फोटो वापरण्यात आल्याचा दावा पीआयबीने केला आहे. त्यामध्ये २०२४ मध्ये लेबनॉनमधील बेरूत येथे झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यातील एक फोटो असल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी.

सरकारचं नागरिकांना आवाहन

केंद्र सरकारने नागरिकांना कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी ते पडताळून पाहण्याचं आवाहन केलं आहे. पीआयबी फॅक्ट-चेकिंग एजन्सीने म्हटलं आहे की अशा दिशाभूल करणाऱ्या मजकुराचा प्रसार केवळ अफवा पसरवत नाही तर सुरक्षा एजन्सींच्या तपासावरही परिणाम करतो. त्यामुळे केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवणाऱ्या खात्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सांगितली आहे.