गेला महिनाभर देशात चर्चा होती ती करोनाच्या Delta Variant ची. हा करोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट म्हणून मानला असतानाच Delta Plus या नव्या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळून आले. त्यामुळे शासकीय स्तरावर देखील चिंता पसरली होती. हा करोनाचा घातक प्रकार असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा घातक परिणाम दिसला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. भारतात आत्तापर्यंत डेल्टा प्लस या करोनाच्या प्रकाराचे फक्त ८६ रुग्णच आढळून आले असल्याची दिलासादायक माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या विषाणूविषयू माहिती दिली आहे. त्यानुसार भारतात आत्तापर्यंत डेल्टा प्लस या विषाणू प्रकाराचे ८६ रुग्ण आढळून आले आहेत. ज्या प्रकारे डेल्टा व्हेरिएंटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, तसा प्रसार डेल्टा प्लस व्हेरिएंटचा झालेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (National Centre for Disease Control – NCDC) संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी दिली आहे. “मे अखेरीसपर्यंत डेल्टा व्हेरिएंटनं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं. त्यामुळे करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ देखील झाली. तेव्हा आढळून येणाऱ्या करोना विषाणूच्या प्रकारांपैकी ९० टक्के हे डेल्टा व्हेरिएंट असायचे”, असं देखील सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
The variants of concern that we monitor are Alpha, Beta, Gamma, Delta and Delta Plus. There are two variants under investigation – Kappa and B1617.3: Dr SK Singh, National Centre for Disease Control Director#COVID19 pic.twitter.com/nBWOufj7mn
— ANI (@ANI) August 10, 2021
दोन नव्या व्हेरिएंट्सवर संशोधन सुरू
दरम्यान, करोनाच्या सध्या मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या करोना विषाणू प्रकारांसोबतच अजून दोन व्हेरिएंट्सवर संशोधन सुरू असल्याची माहिती देखील सिंह यांनी दिली. “आम्ही निरीक्षण करत असलेल्या करोना व्हेरिएंट्समध्ये Alpha, Beta Gamma, Delta आणि Delta Plus या प्रकारांचा समावेश आहे. मात्र, त्यासोबतच Kappa आणि B1617.3 या व्हेरिएंट्सवर देखील संशोधन सुरू आहे”, असं ते म्हणाले.
राज्यात डेल्टाचा धोका वाढतोय!; नाशिकमध्ये ३० रूग्ण आढळले
दरम्यान, नुकताच Delta Plus व्हेरिएंटविषयी WHO नं इशारा दिला होता. “डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक इशारा आहे की हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल. आतापर्यंत, चार चिंताजनक करोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच विभागांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे”, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी दिली होती. या पार्श्वभूीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती दिलासादायक मानली जात आहे.