आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा नारा दिल्यामुळे या पक्षाशी युती केलेल्या रिपब्लिकन पक्षाची मात्र कोंडी झाली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही त्यावर व्यक्त केलेल्या परस्परविरोधी भूमिकेमुळेही कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. शिवसेनेने नव्याने जोरकसपणे मांडलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आरपीआयमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. २५ जूनला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत त्यावर खल होण्याची शक्यता आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पराभवाचा तडाखा बसल्यानंतर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आठवले यांच्या भेटीत शिवशक्ती-भीमशक्तीची कल्पना मांडण्यात आली आणि पुढे त्याचे महायुतीत रुपांतर झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी या तीन मुद्यांवर आम्ही सेना-भाजपशी युती केल्याचा प्रचार आठवले यांनी सुरु केला. परंतु लगेचच झालेल्या मुंबई महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही.  त्यानंतरही महायुतीतच राहण्याचा आठवले यांनी निर्धार जाहीर केला.
लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे लवकरात-लवकर जागा वाटपाची चर्चा  सुरु करावी अशी आठवले यांनी सातत्याने मागणी करुनही त्याला दोन्ही पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरपीआयचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. हिंदूुत्वाची भूमिका मान्य करुन त्यांच्याशी युती केली तर दलित समाजाचे समर्थन मिळणार नाही, असा मानणारा एक प्रबळ गट पक्षात तयार झाला आहे. २५ जूनला नवी मुंबईत आयोजित केलेल्या आरपीआयच्या प्रदेश कार्यकरणीच्या बैठकीत त्यावर खल होण्याची शक्यता आहे.