लखनऊ : इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल सोनेलाल गटाच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी केली आहे.

अपना दलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या ७२ व्या जयंती निमित्त त्यांनी सांगितले, की समाजातील मागास व वंचित लोकांना प्रशासनात वाटा मिळाला पाहिजे. असमानता खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असमानता दूर करण्यासाठी आपल्याला अजून बराच संघर्ष करावा लागणार आहे.

अनुप्रिया पटेल या कुर्मी समाजाच्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या. त्या मिर्झापूरच्या खासदार आहेत. इतर मागासवर्गीयांसाठी मागासवर्गीयांप्रमाणेच स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. सरदार वल्लभभाई  पटेल यांचे  राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अपना दल संसदेत नेहमीच शेतकरी प्रश्नांवरच्या स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आला आहे. मात्र,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सरकारने केलेली नाही.