बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचाराविरोधात निदर्शकांनी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. देशातील निदर्शक व विचारवंतांनी हिंदू समाजावरील व त्यांच्या धर्मस्थळांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. दुर्गा पूजेच्या वेळी काही ठिकाणी मंडप पाडून मूर्तींची विटंबना करण्यात आली होती.

निदर्शकांनी म्हटले आहे,की हिंदूंविरोधातील हिंसाचाराचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. रविवारी रात्री झालेल्या हिंसाचारात एकूण ६६ घरांचे नुकसान करण्यात आले होते तर हिंदूंची २० घरे पेटवण्यात आली होती. देशभर निदर्शनांच्या माध्यमातून त्याचे तीव्र पडसाद उमटले असून ही कृत्ये करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदा करून इतर उपाययोजना कराव्यात असे निदर्शकांचे मत आहे.

ढाका विद्यापीठ शिक्षक संघटनेने हिंदू मंदिरे व दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करताना धार्मिक स्वातंत्र्यासाठी कायदा करण्यात यावा असे म्हटले आहे. विविध विभागांच्या शिक्षकांनी एकत्र जमून मानवी साखळी तयार करीत निषेध केला. ढाका विद्यापीठाचे कुलगुरू एम अखरुझमान यांनी सांगितले, की दुर्गा पूजा हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असून हा उत्सव सर्व लोकांना खुला असतो. त्याविरोधातील हुंसाचार सहन करता येणार नाही. त्यामुळे सरकारने दोषी व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. जातीय हिंसाचार मोडून काढणारा कायदा करण्यात यावा, अशी मागणी नोआखाली विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी कुलगुरू एम वहीदुझमान यांनी केली आहे.  हल्ल्यातील पीडितांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.