डेरा सच्चा सौदाचा व्यवस्थापक रणजित सिंग याच्या १९ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या पंथाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग याच्यासह इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पंचकुला येथील न्यायालयाने राम रहीम, कृष्ण लाल, जसबीर सिंग, अवतार सिंग व सब्दिल यांना ८ ऑक्टोबरला खून प्रकरणात दोषी ठरवले होते. आज न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, असे सीबीआयच्या विशेष वकिलांनी सांगितले.

डेरा सच्चा सौदाचा अनुयायी आणि माजी व्यवस्थापक असलेला रणजित सिंग याला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील खानपूर कोलियाँ खेड्यात १० जुलै २००२ रोजी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले होते. एक निनावी पत्र वितरित केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. डेराच्या मुख्यालयात राम रहीम हा कशा रीतीने महिलांचे लैंगिक शोषण करतो, याचे पत्रात वर्णन करण्यात आले होते.

यापूर्वी दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यासाठी गुरमित राम रहीम याला २०१७ साली २० वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो रोहतकमधील सुनारिया कारागृहात आहे.