Ram Rahim Singh: दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह याला हरियाणा सरकारने २१ दिवसांचा फरलॉ मंजूर केला असून, आज (९ एप्रिल) सकाळी रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून त्याची सुटका करण्यात आली आहे. या फरलॉच्या कालावधीत गुरमीत राम रहीम सिंग सिरसा येथील त्याच्या डेराच्या मुख्यालयात राहणार आहे.

यापूर्वी जानेवारीमध्ये, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी त्याला ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यावेळी तो सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात राहिला होता. जानेवारीच्या आधी जेव्हा राम रहीमला तुरुंगातून रजा मंजूर झाली होती तेव्हा तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील डेराच्या आश्रमात राहीला होता.

दरम्यान राम रहीम सिंगला पॅरोल आणि फरलॉ अनेकदा हरियाणा, पंजाब, दिल्ली किंवा राजस्थानमधील निवडणुकांच्या काळातच मिळाले आहेत. या राज्यांमधील अनेक मतदारसंघांमध्ये, विशेषतः हरियाणामध्ये, डेराचे अनुयायी मोठ्या संख्येने असल्याचे म्हटले जाते.

यापूर्वी २८ जानेवारी रोजी, राम रहीम सिंहला ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले होते. तो तुरुंगातून सुटल्यानंतर आठ दिवसांनी ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी त्याचा पॅरोल संपल्यानंतर त्याला पुन्हा सुनारिया तुरुंगात आणण्यात आले होते. याचप्रमाणे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, हरियाणामधील निवडणुकीच्या तीन दिवस आधीही त्याला २० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

दरम्यान, डेरा सच्चा सौदाचा स्थापना दिवस या महिन्याच्या २९ एप्रिल रोजी आहे. त्यामुळे त्याचा डेरात मोठा कार्यक्रम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवेळीप्रमाणे, यावेळीही राम रहीमवर प्रवचन देण्यावर किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी कायम असणार आहे.

२०२० पासून ३०० दिवस तुरुंगाबाहेर

२०१७ पासून तुरुंगात असलेल्या राम रहीमला अनेक वेळा फरलॉ आणि पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. २०२० पासून, सुमारे ३०० दिवस तो पॅरोल आणि फरलॉवर तुरुंगाच्या बाहेर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम रहीमला त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय, पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने राम रहीमसह ४ जणांना १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.