Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जेएनयूमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलक विद्यार्थ्यांनी काय म्हटलं आहे?
संघाचा प्रपोगंडा चालणार नाही असं म्हणत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तिरस्कार पसरवत आहेत. त्यांच्या राजकारणामुळे तिरस्कार पसरतो आहे. त्यामुळे आम्ही निदर्शनं करत आहोत. जेएनयूसारख्या जागेत अशा लोकांना स्थान नाही. तिरस्कार पसरवणाऱ्या, समाजात विष कालवणाऱ्या लोकांना जेएनयूमध्ये स्थान नाही. असं आंदोलन करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्राच्या उद्घाटनासाठी दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात जेएनयूमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस हे समाजात तेढ निर्माण करत आहेत. कपडे बघून लोकांना ओळखा असं जर देवेंद्र फडणवीस सांगत असतील, भाजपाचे लोक सांगत असतील हिंदी भाषा लादणार असतील तर आम्ही का गप्पा बसायचं? आम्हाला इथे केंद्र सुरु आहे त्याबाबत काही म्हणणं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ते उद्घाटन होतं आहे त्यावर आमचा आक्षेप आहे. या परिसरात घोषणाबाजी झाली तरीही देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्राचं उद्घाटन केलं आहे. दरम्यान हे उद्घान सुरु असताना देवेंद्र फडणवीस वापस जाओ अशा घोषणा देण्यात आल्या.
दिल्लीतील जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उदघाटन आज झाले. तत्पूर्वी येथील डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे, येथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेएनयुतील सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखले होतं.