प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याकरता एक समाज तयार झाला आहे, या समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आंदोलनजीवी असं म्हटलं आहे. ते आज दिल्लीत सुशासन महोत्सव २०२४ उद्घाटन समारंभ – सुशासन आणि नवोपक्रमाचा राष्ट्रीय उत्सव कार्यक्रमात बोलत होते.
“आमच्या प्रकल्पांना विरोध का असतो? सरकारसमोर विश्वासाबाबत खूप मोठं संकटआहे. सरकार तुमची जागा घेईल, त्याबदल्यात तुम्हाला काहीच देणार नाही, असं पूर्वपार लोकांच्या मनात बिंबवलं गेलं आहे. आणि हे खरंही आहे. कारण लोकांनी हे पूर्वी पाहिलं आहे. जेव्हा तुम्ही प्रकल्प करता, तेव्हा तुम्ही लोकांशी संवाद साधता. प्रत्येक प्रकल्पात अडचणी असतात. प्रत्येक प्रकल्पात प्रकल्पबाधित असतात. पण अशा लोकांबरोबर आम्ही संवाद साधला. आम्ही काय करू इच्छित आहोत, यातून त्यांचं कसं भलं होणार आहे हे आम्ही या संवादातून जनतेला सांगतो. या सर्वांमध्ये पारदर्शकता फार महत्त्वाची असते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रिफायनरीला ठाकरेंनी विरोध केला
“लोकांसमोर तुम्ही पारदर्शकता ठेवली पाहिजे. आम्ही कोकणात रिफायनरी करणार होतो. पण आम्हाला उद्धव ठाकरेंनी प्रचंड विरोध केला. या विरोधाला आम्हाला थांबवावं लागलं. त्यांच्याविरोधात जाऊन १० हजार लोकांनी आम्हाला पत्र पाठवली की आम्ही जागा देण्यास तयार आहोत. परंतु, त्यांचं सरकार आल्याने तो प्रकल्प रखडला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रकल्पांना विरोध करण्याकरता इको सिस्टिम तयार झालीय
“आपल्या पंतप्रधानांनी नवी व्याख्या दिली आहे की आंदोलनजीवी. या प्रकल्पात आंदोलनजीवी दिसले. अनेक पक्ष आणि अनेक लोक आंदोलनजीवी आहेत. एक असा समाज तयार झाला की तो प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो. प्रत्येक प्रकल्पात एकाच प्रकारचे लोक विरोध करत होते. त्यांना एकाच ठिकाणाहून पैसा येत आहे. एकप्रकारे आमच्या देशात विकासाचा विरोध करण्यासाठी एक इको सिस्टिम तयार करण्यात आली आहे. या इको सिस्टिमला तोडावं लागतं”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.