scorecardresearch

छत्तीसगडमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान कारने भाविकांना चिरडले, १ ठार, २० जखमी

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये शुक्रवारी एका भरधाव कारने भाविकांना चिरडले.

छत्तीसगडमध्ये दुर्गा विसर्जनादरम्यान कारने भाविकांना चिरडले, १ ठार, २० जखमी

छत्तीसगडमधील जशपूरमध्ये शुक्रवारी एका भरधाव कारने भाविकांना चिरडले. आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जखमी झाले आहे. मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राज्यातील जशपूर जिल्ह्यात झाला. दुर्गा विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा मध्ये कारने अक्षरक्षा भाविकांना चिरडले. 

या अपघातात ठार झालेल्या एका व्यक्तीचे नाव २१ वर्षीय गौरव अग्रवाल असे असून तो जशपूरच्या पाथळगावचा रहिवासी आहे. जखमींना पाथळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एनआय या वृत्तसंस्थेने ब्लॉक वैद्यकीय अधिकारी जेम्स मिन्झ यांच्या हवाल्याने सांगितले की, जखमींपैकी दोन जणांना फ्रॅक्चरमुळे दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संपूर्ण कार गांजाने भरलेली  

संतप्त लोकांनी कारचा पाठलाग केला आणि ती पुढे एका ठिकाणी सापडली. चालकाचा बाजूचा दरवाजा उघडा होता आणि मागील दरवाजाची खिडक्या आणि दाराच्या खिडक्या तुटल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, चालक कार सोडून पळून गेला. जेव्हा लोकांनी कार पकडली तेव्हा संपूर्ण कार गांजाने भरलेली आढळली. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आरोपींना अटक

पोलीस अधीक्षक, जशपूर यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (वय २१) आणि शिशुपाल साहू  (वय २६), असे त्यांची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत आणि छत्तीसगडमधून जात होते. पोलिसांकडून दोन्ही आरोपींवर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2021 at 18:29 IST

संबंधित बातम्या