Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली होती. या घटनेतत २६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तब्बल एका महिन्यांनी या अपघातासंदर्भात भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोचा (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था-AAIB) अपघाताच्या कारणांबाबतचा एका अहवाल समोर आला. या अहवालात एएआयबीने म्हटलं की, ‘१२ जून रोजी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील इंधन नियंत्रण स्विच बंद झालं होतं’. मात्र, या अहवालानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.

या अहवालात विमानातील वैमानिकांचा संवादही समोर आला होता. त्यामध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेलं नाही’ असा संवाद या अहवालातून समोर आला. दरम्यान, या अहवालानंतर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचण्याचं आवाहन केलं होतं.

दरम्यान, असं असतानाच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील नोंदणीकृत सर्व विमानांच्या इंजिन इंधन स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, डीजीसीएने सर्व एअरलाइन्सना २१ जुलै २०२५ पर्यंत इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र, डीजीसीएचा हा आदेश विशेषतः बोईंग कंपनीच्या विमान मॉडेल्सशी संबंधित असणार आहे. ज्यामध्ये ७३७ आणि ७८७ ड्रीमलायनर (७८७-८/९/१०) या मालिकेचा समावेश आहे. दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर या विमानाच्या अपघाताबाबतचा एएआयबीचा अहवाल समोर आल्यानंतर डीजीसीएने आता हे पाऊल उचललं आहे.

‘एएआयबी’च्या अहवालानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री काय म्हणाले होते?

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं की, “या अपघाताच्या घटनेचा समोर आलेला अहवाल हा केवळ प्राथमिक आहे. अंतिम निष्कर्ष जाहीर होईपर्यंत आताच निष्कर्षांपर्यंत पोहोचू नका. फक्त वैमानिकांच्या संभाषणावरून निष्कर्ष काढण्यात येऊ नये”, असं आवाहन मंत्री राम मोहन नायडू यांनी माध्यमांना आणि जनतेला केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तसेच अद्याप अनेक तांत्रिक बाबींचं विश्लेषण बाकी आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय या अहवालाचं सखोल विश्लेषण करत आहे. आपण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो”, असं मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे.