बांगलादेशची राजधानी ढाकामधील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम अहमद चौधरी पोलिस चकमकीत ठार झाला आहे. चौधरीसह आणखी दोघा जणांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांनी जमात उल मुजाहिदीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नारायणगंजमधील एका इमारतीवर शनिवारी सकाळी धडक दिली होती. सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. पोलिसांसोबतच्या चकमकीत कॅफेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम ठार झाल्याचे बांगलादेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त हुसैन यांनी जाहीर केले. ६० दिवसांच्या आतच पोलिसांना हल्ल्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.
तमीम हा कॅनडात राहणारा बांगलादेशी तरुण होता. कॅनडात असताना तमीमने परदेशातून पैसे गोळा केले आणि २०१३ मध्ये तो पुन्हा बांगलादेशमध्ये परतला होता. या हल्ल्याचा कट त्यानेच रचल्याचा पोलिसांचा दावा आहे. ढाकामधील गुलशन या आलिशान कॅफेवर १ जुलैरोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय तरुणी आणि १६ परदेशी नागरिकांसह २२ जणांचा मृत्यू झाला होता. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बांगलादेशच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वात भ्याड दहशतवादी हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध झाला होता. या हल्ल्यानंतर बांगलादेशमधील यंत्रणांनी दहशतवादी संघटनांविरोधात मोहीमच उघडली आहे.
दुस-या मास्टरमाईंडची ओळख पटली
गुलशन कॅफेवरील हल्ल्यातील दुस-या मास्टरमाईंडची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मर्झान नामक एका व्यक्तीला हल्ला करणारे दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाठवत होते अशी माहितीही समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhaka cafe attack mastermind 2 others killed in encounter
First published on: 27-08-2016 at 12:13 IST