Dharmasthala चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील धर्मस्थळ या ठिकाणी नेत्रावती नदीच्या काठावर शेकडो मृतदेह पुरण्यात आल्याचा दावा एका सफाई कर्मचाऱ्याने केला होता. यानंतर विशेष तपास समितीने (SIT) १३ ठिकाणी खोदकाम सुरु केलं. खोदकामाच्या तिसऱ्या दिवशी मानवी हाडं सापडली होती. १ ऑगस्टला ही बातमी समोर आली होती त्यानंतर आता आणखी एका मुलीची हाडं सापडली आहेत असा दावा एसआयटीने केला आहे.

नेत्रावती नदीच्या काठावरच्या वनक्षेत्रात पुन्हा हाडं सापडली

नेत्रावती नदीच्या काठावरील वनक्षेत्रात उत्खननादरम्यान किमान १५ हाडे सापडली आहेत. त्यापैकी अनेक हाडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्खननात कोणतीही कवटी सापडली नाही. फॉरेन्सिक पथकाने हाडे ताब्यात घेतली होती आता यानंतर ११ व्या ठिकाणी महिलेची हाडं आढळून आल्याचं एसआयटीने म्हटलं आहे. एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार एका स्वच्छता कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती सर्वात आधी दिली होती. या सफाई कर्मचाऱ्याला अशी धमकी देण्यात आली होती की घडल्या प्रकाराची वाच्यता करशील तर तुला ठार करुन याच ठिकाणी पुरलं जाईल. मात्र त्याच्या फोनमुळे या प्रकरणाला वाचा फुटली असं एसआयटीने सांगितलं आहे.

धर्मस्थळ नेमकं कुठे आहे?

धर्मस्थळ हे ठिकाण कर्नाटकच्या पश्चिम घाट भागात आहे. श्री मंजुनाथेश्वराचं घर म्हणून धर्मस्थळ ओळखलं जातं. दरम्यान या ठिकाणी जी हाडं मिळत आहेत त्यातली हाडं महिलांची आहेत. त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली आणि त्या महिलांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत अशी माहितीही एसआयटीने दिली आहे. बलात्कार आणि हत्येची ही प्रकरणं २० वर्षांपूर्वीची आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या माजी कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली ज्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

साक्षीदाराने नेत्रावती नदीच्या काठावर मृतदेह पुरल्याची माहिती दिली

साक्षीदाराने नेत्रावती नदीच्या काठावर आठ ठिकाणी मृतदेह पुरल्याचे सांगितले आहे. उर्वरित पाच ठिकाणे जंगलात आहेत. एसआयटी सूत्रांनी सांगितले आहे की, सफाई कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून पोलिसांना एक कवटी दिली होती. पण, त्याने कवटी कुठे सापडली हे सांगितले नाही. त्याने सांगितले की, तो धर्मस्थळला गेला आणि शांतपणे कवटी खोदून काढून आणली. अशी माहिती एसआयटी सूत्रांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान या ठिकाणी जो हाडांचा शोध घेण्यात येतो आहे, त्या ठिकाणी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. ज्या ठिकाणी खोदकाम केलं जातं आहे त्या ठिकाणी एका १३ वर्षीय मुलीचा मृतदेह पुरण्यात आला होता अशी माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने दिली आहे.