झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांचं निवासस्थान आणि कंपनीच्या कार्यालयांसह दहा ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापा मारला होता. या छापेमारीत ३५४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. धीरज साहू यांच्या घरात आणि कंपनीच्या कार्यालयामधील कपाटांमध्ये कोट्यवधी रुपये ठासून भरले होते. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना या नोटा मोजण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. या कारवाईवरून भारतीय जनता पार्टीने काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वच भाजपा नेते साहू यांच्यासह काँग्रेस पक्षावर टीका करत आहेत. साहू यांच्याकडे इतके पैसे कुठून आले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यावर अखेर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

धीरज साहू यांच्यावर कारवाई होत असताना त्यांचा पक्ष म्हणजेच काँग्रेसने त्यांचा कुठल्याही प्रकारे बचाव केला नाही. उलट काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणापासून स्वतःला वेगळं ठेवलं आहे. काँग्रेसचे सचिव आणि खासदार जयराम रमेश यांनी काँग्रेसकडून सर्वप्रथम यावर भाष्य केलं. जयराम रमेश यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. या संपत्तीबाबत फक्त साहूच सांगू शकतात. तसेच प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घर-कार्यालयात सापडलेल्या रोख रकमेबाबत केवळ साहू यांनीच स्पष्ट करावं.

दरम्यान, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनीदेखील आता या प्रकरणावर भाष्य केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आजच्या (११ डिसेंबर) दिवसाचं कामकाज संपल्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी चौधरी यांना विचारण्यात आलं की, साहू यांच्याकडे इतके पैसे कुठून आले? यावर खासदार चौधरी म्हणाले, त्यांच्या कुटुंबाचा गेल्या अनेक पिढ्यांपासून व्यवसाय आहे. हे पैसे त्यांनी कुठे कमावले, कोणाकडून आणि कसे कमावले याबाबत सरकारनेच तपास करावा.

हे ही वाचा >> “देशात इतका काळा पैसा…”, ३५० कोटींचं घबाड सापडलेल्या धीरज साहूंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या पैशांचा आणि काँग्रेसचा काहीच संबंध नाही. ते त्यांचे पैसे आहेत. ती संपत्ती केवळ एका कुटुंबाची आहे. तसेच ते पैसे आमच्या खासदाराचे आहेत का हेदेखील कोणाला माहिती नाही. ते पैसे धीरज साहू यांचे आहेत की, त्यांचे वडील, आजोबा किंवा भावाचे आहेत हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे सरकारी तपास यंत्रणांनी या गोष्टीचा तपास करावा. तसेच जे लोक आत्ता आक्रमकपणे बोलत आहेत तेच लोक नीरव मोदी किंवा मेहुल चोकसी यांची प्रकरणं बाहेर आली तेव्हा मूग गिळून गप्प बसले होते.