देशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल असा विश्वास धुळ्यातील सराफांनी व्यक्त केला आहे. लोकसत्ता ऑनलाईनने धुळ्यातील काही सराफांची मतं घेतली मोदी सरकारबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इथल्या सराफांनी फिर एक बार मोदी सरकार हाच नारा दिला आहे. तसेच धुळ्यातून सुभाष भामरेही विजयी होतील असंही या सराफांनी म्हटलं आहे.
धुळ्यातील संदीप ज्वेलर्सचे संदीप सोनार म्हणतात, मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे कारण त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीसारखा निर्णय घेऊन या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली. अनेकदा रोखीचे व्यवहार होत होते. मात्र त्याचा काही हिशेब ठेवला जात नव्हता, त्या सगळ्या प्रकारांवर निर्बंध बसवण्याचं काम जीएसटीमुळे झालं. नोटाबंदीचा निर्णय फसला अशी टीका काही लोक करतात मात्र ते खरं नाही. काही निर्णयांचे वाईट परिणाम आधी दिसतात आणि चांगले नंतर नोटाबंदीचा निर्णय हा असाच आहे असं वाटत असल्याचंही सोनार यांनी स्पष्ट केलं.
तर एस कांतिलाल ज्वेलर्सचे मालक आणि धुळे जिल्हा सराफ बाजार समितीचे उपाध्यक्ष जितेंद्र कांतिलाल म्हणतात की देशाला पुन्हा एकदा मोदींची गरज आहे. धुळ्यात सुभाष भामरे कमी मताधिक्याने जिंकतील, पण ते जिंकतील असा विश्वास वाटतो कारण हे मतदानही २०१४ प्रमाणेच मोदींकडे बघून होते आहे. उमेदवार कोण हे महत्त्वाचे वाटत नाही तर आम्ही मोदींकडे पाहून मतदान करणार असं कांतिलाल यांनी म्हटलं आहे. धुळ्यात काँटे की टक्कर असेल असं वाटतं पण भामरे यांना यश मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
खरं तर जीएसटीमुळे आमचा व्यवसाय हा ४० टक्के उरला आहे अशी तक्रारही कांतिलाल यांनी केली. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळेही आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असं असलं तरीही मोदी सत्तेत आले पाहिजेत आणि त्यांना आणखी एक संधी दिली पाहिजे असं कांतिलाल यांनी म्हटलं आहे.
दीपक गोल्ड या दुकानाचे मालक दीपक मेहता म्हणतात, मोदी सरकारने जीएसटी लावल्याने आम्हाला काही काळ मंदीचा सामना करावा लागला मात्र आता सारं काही स्थिर स्थावर होतं आहे. निर्णय कठोर होता मात्र त्याची अंमलबजावणी आवश्यक होती. नोटाबंदीच्या निर्णयामुळेही सराफ व्यवसायातील काळा बाजार थांबण्यास मदत झाली असंही मेहता यांनी म्हटलं आहे.
तर नाशिककर ज्वेलर्सचे सुरेश नाशिककर म्हणतात, पुन्हा एकदा मोदींना संधी दिली पाहिजे. काँग्रेसच्या काळात जे घडलं नाही त्या कामांची चांगली सुरूवात या सरकारने केली आहे. त्यांना एक संधी दिली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीत धुळे शहराचा आढावा घेतल्यास सराफांनी त्यांचा पाठिंबा मोदींना दिला आहे.