पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडावे की असहिष्णुतेच्या मुद्दय़ांवर सरकारला चर्चेस भाग पाडायचे यावर काँग्रेसमध्ये अद्याप एकमत झालेले नाही.
काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी असहिष्णुता, महागाईच्या मुद्दय़ावर सरकारची चर्चेदरम्यान कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. तर घोषणाबाजी, निदर्शने करून दुसऱ्या आठवडय़ापर्यंत कामकाज स्थगित करण्यास सरकारला बाध्य करण्याचा आग्रह काँग्रेस नेते दीपेंदर हूडा यांनी धरला आहे. जीएसटी विधेयकासाठी सरकार कोणत्याही चर्चेस तयार होईल. त्यामुळे सरकारला असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर चर्चेस भाग पाडून पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी काँग्रेस पक्ष सभागृहात करेल. याचा कित्ता राज्यसभेतही गिरवला जाईल.
साहित्यिक, लेखक, विचारवंतांची पुरस्कार वापसी, दादरी प्रकरण, हरयाणात दलित कुटुंबीयांना जिवंत जाळण्याची घटना यावरून सरकारविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोर्चा काढला होता. हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे हाच मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. दररोज प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्यासाठी खरगे नोटीस देतील, अशी रणनीती काँग्रेसने आखली आहे. ती मान्य न झाल्यास घोषणाबाजी, निदर्शने करून कामकाजात व्यत्यय आणण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मोदींनी देशाची मान झुकवली’
आम्ही सत्तेत येण्यापूर्वी जगाला भारताविषयी विश्वासार्हता वाटत नव्हती, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटन दौऱ्यावर असलेल्या मोदी यांच्या या वक्तव्यामुळे देशाची मान शरमेने झुकल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केली. ते म्हणाले की, मोदींचा हा दावा खोटा आहे. यापूर्वीदेखील भारताकडे सन्मानाने पाहिले जात असे. त्यात यापूर्वीच्या काँग्रेस सरकारचा मोठा वाटा होता, हे विसरता कामा नये.
परदेशी धरतीवर असहिष्णुतेवर प्रतिक्रिया देणाऱ्या मोदींविरोधात शर्मा यांनी आगपाखड केली. ते म्हणाले की, देशात असहिष्णुता वाढली आहे. त्यास केवळ मोदींची कार्यशैली जबाबदार आहे. देशात सध्या भीतीचे वातावरण आहे. ते पसरवणाऱ्या संघटना/शक्तींना मोदींचे प्रोत्साहन मिळते. त्यामुळे अशा विचारांचा प्रसार होतो. या साऱ्या प्रकारामुळे परदेशी गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण असलेल्या भारताची प्रतिमा मलिन होत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा गेला. देशात वाढलेल्या असहिष्णुतेच्या घटनांवर मोदींना परदेशात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मोदी म्हणाले होते की, सरकार सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. असहिष्णुता पसरवणाऱ्या कोणत्याही घटनेच्या विरोधात सरकार आहे. मोदी सातत्याने परदेशी धरतीवर भारताची प्रतिमा मलिन करीत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Differences in congress party over creating deadlock in parliament
First published on: 14-11-2015 at 02:23 IST