नरेंद्र मोदी आणि अजित दोवल यांना युद्धाची खुमखुमी असून हे दोघेही युद्धपिपासू असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा आरोप केला. भारत आणि पाकिस्तानला युद्धाचा पर्याय परवडेल का, या प्रश्नाला उत्तर देताना दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, मी नरेंद्र मोदी आणि अजित दोवाल या दोघांकडे युद्धपिपासू व्यक्ती म्हणून बघतो. २९ सप्टेंबरला भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. त्यानंतर देशभरातून भारतीय लष्कराचे आणि मोदी सरकारचे कौतुक झाले होते.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करत सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, दिग्विजय सिंह यांनी याबाबत पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे. संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) कार्यकाळातही अशाप्रकारचे सर्जिकल स्ट्राईक झाले होते. मात्र, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रत्येकवेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन कारवाईचा बभ्रा होणार नाही, याची काळजी घेतली होती. तेव्हाच्या आणि आताच्या कारवाईमध्ये स्वत:ची पाठ थोपटून घेणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये आपला प्रचार करणे हाच काय तो फरक आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भारत-पाक युद्ध आणि शांतता यापैकी काय महत्त्वाचे आहे? भारताच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसू नये, यासाठी दोन्ही देशांमध्ये शांतता असणे गरजेचे असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले. भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकच्याबाबत कार्यकर्त्यांना उर बडवेगिरी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि कनिष्ठ नेते आपली पाठ थोपटून घेत असल्याची टिप्पणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे.