राजमुद्रेच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेले प्रख्यात चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे इंदूरमध्ये शनिवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. भार्गव हे एक दशकाहून अधिक काळ हृदयासंबंधी विकारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीही करण्यात आली होती. संविधानातील पांडुलिपीची पानेही त्यांनी तयार केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आहेत.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भार्गव यांना दहा वर्षांहून अधिक काळ हृदयविकाराचा त्रास होता. त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला, असे त्यांची सून सापेक्षी भार्गव यांनी सांगितले. १ नोव्हेंबर १९२७ रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे भार्गव यांचा जन्म झाला होता. कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते. बोस यांनीच भारतीय संविधानातील पांडुलिपीची पाने तयार करण्यासाठी भार्गव यांची निवड केली होती. बोस यांनी त्यांची निवड केली त्यावेळी भार्गव हे शांती निकेतनमधील ललित कलेत तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगतात प्रसिद्ध होती. १९५० च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते.