‘म्हाडा’तील निलंबित उपायुक्त नितीश ठाकूरला संयुक्त अरब अमिरातीतून (यूएई) अटक करण्यात आली आहे. नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणासाठी भारताने यूएईशी संपर्क साधला असून लवकरच त्याला भारतात आणले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आरोपी असलेला नितीश ठाकूर २०१५ मध्ये नेपाळ मार्गे यूएईत पळाला होता. यूएईत त्याने हंगामी नागरिकत्व देखील मिळवले होते. जून २०१७ मध्येच त्याच्या व्हिसाची मुदत संपली होती. मुदत वाढवून मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. ठाकूरला यूएईतून अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी संसदेत दिली. नितीश ठाकूरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रीया सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाकूरचे दुबई आणि सिंगापूरमध्ये नियमित येणे-जाणे होते. सिंगापूरमध्ये त्याचा मुलगा शिकत आहे. दुबईत ठाकूर गुन्हेगारी क्षेत्रातील गुंडांशी संपर्कात आल्याचे सांगितले जाते.
कोट्यवधी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याच्या प्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी नितीश ठाकूरला अटक केली होती. मात्र, काही महिन्यांमध्येच त्याला जामीन मिळाला. नितीश ठाकूर नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ठाकूरचा जामीन रद्द करावा आणि त्यांचा पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याची मागणी देखील सरकारी वकिलांनी २०१३ मध्येच केली. याच दरम्यान नितीश ठाकूरने देशाबाहेर पळ काढला. भारतातील सुरक्षा यंत्रणांना इंटरपोलच्या मदतीने नीतीश ठाकूरविरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. नितीश ठाकूरच्या भावालाही गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. ईडीनेही ठाकूरवर कारवाई केली होती.
म्हाडाच्या उपायुक्तपदी असताना ठाकूरने बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्याच्या नावावर मुंबईत जवळपास २६ फ्लॅट आहेत. ठाकूरला दुबईतूनही पैसे मिळत असल्याचे समोर आले होते.