तमिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही प्रमुख पक्षांचे अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचारादरम्यान काही नेतेमंडळींनी केलेली विधानं मोठा वाद निर्माण करतात. द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी केलेलं असंच एक विधान वादाचा विषय ठरलं आहे. दोनच दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी “ममता दीदींनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल”, असं वादग्रस्त विधान केलं होतं. आता द्रमुकच्या नेत्याने महिलांबद्दल गंभीर विधान केलं आहे. “परदेशी गायींचं दूध प्यायल्यामुळेच आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून त्या जाड झाल्या आहेत”, असं दिंडिगल लिओनी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

दिंडीगल लिओनी हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते असून कोइम्बतूरमध्ये पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांच्यासाठी प्रचार करत होते. सिवसेनापती हे सेनापती केनगयम कॅटल रिसर्च फाऊंडेशनचे ट्रस्टी देखील आहेत. त्यासंदर्भात बोलताना लिओनी म्हणाले, “तुम्हाला माहिती आहे का, की अनेक प्रकारच्या गायी असतात. शेतामध्ये तुम्हाला हल्ली परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील. लोकं या गायींसाठी दूध काढायचं मशिन वापरतात. दिवसाला ४० लिटर दूध मिळतं. ते दूध प्यायल्यामुळे आपल्या सगळ्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या आहेत. आधी महिलांची फिगर (इंग्रजीतल्या) आठ आकड्यासारखी होती. मुलांना त्या कंबरेवर ठेवत असतं. पण आता जर त्यांनी मुलांना तसं ठेवलं, तर मुलं देखील घसरून पडतील. कारण महिला आता बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली सगळी मुलं देखील जाड झाली आहेत”, असं लिओनी म्हणाले आहेत.

 

विशेष म्हणजे, हे सगळं बोलत असताना लिओनी यांच्या हातात रेशनिंगचा तांदूळ देऊन त्याच्या दर्जावर त्यांनी बोलावं असं सुचवण्याचा प्रयत्न एका कार्यकर्त्याने केला. त्यावर ते थोडा वेळ बोलले देखील. पण पुन्हा ते महिलांबाबतच्या आपल्या मूळ विषयावर आले, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कनिमोळी यांच्याकडे लिओनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dmk leader dindigul i leoni controversial statement women fat like barrel cow milk pmw
First published on: 25-03-2021 at 13:42 IST