दक्षिण चिनी समुद्र परिसरातील मतभेदांवर अमेरिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला अहवाल चीनने फेटाळून लावला आहे. याप्रकरणी कोणाचीही बाजू घेणार नाही, आम्ही निष्पक्ष राहू हे अमेरिकेचे आश्वासन त्यांनी मोडीत काढले आहे, असा आरोप चीनने केला. तसेच दक्षिण चिनी समुद्रात ‘पक्षपाती’पणा नको असा इशाराही अमेरिकेला दिला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या मूलभूत बाबींकडे अमेरिकेने आपल्या अहवालात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोपही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी केला. ‘ लिमिट्स इन् द सीस – चायना : मेरिटाइम क्लेम्स इन् द साऊथ चायना सी’ या अमेरिकेच्या संरक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालावर लेई आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनकडून आपला हक्क सांगितला जातो. मात्र, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स आणि ब्रुनेई यांनीही या परिसरातील काही प्रदेशांवर आपला हक्क सांगितला आहे.
कोणताही सीमा प्रश्न हा त्या-त्या देशाशी थेट संवाद साधून सोडविण्याचा चीनचा प्रयत्न असतो. इतिहास आणि आंतरराष्ट्रीय कायदा अशा वाटाघाटींमध्ये संदर्भ म्हणून वापरला जातो आणि म्हणूनच अमेरिकेने आपली बांधीलकी जपावी, अशी आग्रही सूचना हाँग लेई यांनी केली.
दरम्यान, दक्षिण आशियाई क्षेत्रावर भारताला आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे असल्याने ‘सार्क’विस्ताराला भारत विरोध करीत असल्याचा आरोप चीनमधील विचारवंतांनी केला आहे. आठ सदस्यीय देशांच्या समूहात चीन सहभागी झाला तर भारतविरोधी गट आकाराला येईल, अशी भारताला भीती वाटत असल्याचेही चीनने म्हटले आहे.