Donald Trump Tariff Impact on Indian Market: गेल्या चार महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांनी जाहीर केलेले टॅरिफ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. आधी जगातल्या सर्वच देशांवर कमी-अधिक प्रमाणात त्यांनी टॅरिफ लागू केले होते. चीनवर तर जवळपास १५० टक्के टॅरिफ लागू करण्यात आले होते. नंतर हे टॅरिफ दर कमी करण्यात आले. यादरम्यान भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली सबुरीची भूमिका आता संपल्याचं दिसून येत आहे. कारण येत्या १ ऑगस्टपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि त्यावर अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. याचा अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसू शकतो!

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात Truth Social या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली असून त्यात भूमिका स्पष्ट केली आहे. “लक्षात घ्या, भारत आमचा मित्रदेश आहे. पण गेल्या अनेक वर्षांत आम्ही त्यांच्याशी फार कमी व्यापार केला आहे. कारण भारताकडून आकारण्यात येणारे टॅरिफ खूप जास्त आहेत. जगातल्या सर्वाधिक टॅरिफ दरांपैकी एक. शिवाय इतर देशांवर त्यांच्याकडून लागू करण्यात आलेले व्यापारविषयक नियमही अत्यंत कठोर आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामागे आयात-निर्यातीतील तफावत कारणीभूत?

दरम्यान, भारतातून अमेरिकेत होणारी आयात व निर्यात यातील तफावत ही ट्रम्प यांनी घेतलेल्या २५ टक्के टॅरिफसाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातून अमेरिकेत होणारी आयात ११.६ टक्क्यांनी वाढून ८६.५ बिलियन डॉलर्सपर्यंत गेली आहे. त्याचवेळी अमेरिकेतून भारतात होणारी निर्यात ७.४ टक्क्यांनी वाढली असली, तरी तिचं एकूण प्रमाण हे ४५.३ बिलियन डॉलर्स इतकंच आहे. त्यामुळे या दोन्हींमधील ४१ बिलियन डॉलर्सची तफावत अमेरिकन सरकारसाठी तोट्याची असल्याचं गणित मांडलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारतातील एकूण ५ क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर हा २५ टक्के आयात कर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत सर्वाधिक निर्यात होणाऱ्या वस्तूंनाच याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.

१. स्मार्टफोन: भारतानं चालू आर्थिक वर्षात अमेरिकेत स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत नुकतंच चीनला मागे टाकलं आहे. आता अमेरिकेला स्मार्टफोन निर्यात करणारा भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. अमेरिकेत निर्यात होणाऱ्या एकूण स्मार्टफोनपैकी भारताचं प्रमाण ४४ टक्के आहे. भारतातील स्मार्टफोन व्यवसायात जानेवारी २०२५ मध्ये तब्बल ३ बिलियन डॉलर्सइतक्या स्मार्टफोन्सची एकूण निर्यात झाली आहे.

२. पेट्रोलियम उत्पादने: आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल शुद्धीकरण केंद्र ठरलेल्या भारतातून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम उत्पादने अमेरिकेत निर्यात होतात. त्यात पेट्रोल, डिझेल, जेट इंधन, गॅसोलिन आणि एलपीजी यांचा समावेश आहे. अमेरिकेतील इंधन पुरवठ्यासाठी आता भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. २०२४ मध्ये तब्बल २० बिलियन डॉलर्सइतक्या मूल्याची पेट्रोलियम उत्पादने भारतातून अमेरिकेत निर्यात झाली आहेत.

३. मौल्यवान हिरे व दागिने : अमेरिका भारतातील मौल्यवान हिरे, दागिने व सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतातून नक्षीकाम केलेले व साधे अशा दोन्ही प्रकारचे खडे अमेरिकेत निर्यात होतात. गेल्या वर्षी या क्षेत्रातून अमेरिकेत तब्बल ८.५ बिलियन डॉलर्स इतक्या मूल्याची निर्यात झाली होती.

४. औषधे व साहित्य : जागतिक स्तरावर परवडणाऱ्या दरातील औषध पुरवठ्याचा भारत हा कणा आहे. अमेरिकेतील नागरिकांसाठी आरोग्यविषयक बाबींचा खर्च कमी करण्यासाठी भारतातून सर्वाधिक प्रमाणात औषधे आयात केली जातात. २०२५ मध्ये या क्षेत्रातील भारताची अमेरिकेतील निर्यात ७.५ बिलियन डॉलर्स मूल्याइतकी झाली आहे.

५. टेक्स्टाईल व कपडे : भारतातून हातमागावरील सिल्कपासून ते कंपन्यांमधील मशीनवर तयार होणाऱ्या कॉटनपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टींची मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला निर्यात केली जाते. २०२५ मध्ये या क्षेत्रातील अमेरिकेला झालेल्या निर्यातीचं प्रमाण २.५ बिलियन डॉलर्स इतकं होतं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच मोबाईल, पेट्रोलियम, सोन्याचे दागिने, औषधे व कपड्यांच्या क्षेत्राला डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आयातीवर हे दर लागू होणार असल्यामुळे पर्यायाने आयात कमी होऊन भारतातील निर्यातीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.