Donald Trump on India-Pakistan War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (१६ ऑगस्ट) अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी फॉक्स न्यूजशी बातचीत केली. या चर्चेवेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की भारत व पाकिस्तानमधील युद्ध त्यांनीच रोखलं. ट्रम्प यांनी दावा केला आहे की भारत-पाकिस्तानमधील युद्धाव्यतिरिक्त त्यांनी आणखी चार मोठी युद्ध थांबवली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ वेळा दावा केला आहे की त्यांनीच भारत-पाकिस्तान युद्ध रोखलं. आज त्यांनी पुन्हा एकदा जुन्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. उभय देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं होतं. याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “१० मे रोजी मी भारत व पाकिस्तानच्या प्रमुखांशी बातचीत केली. माझ्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती दर्शवली. दोन्ही देश एकमेकांवर बॉम्बवर्षाव करत असतानाच आण्विक युद्धाची भिती निर्माण झाली होती. जग अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर आलं होतं. मात्र, मी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी बोलून ते युद्ध थांबवलं.” दुसऱ्या बाजूला भारताने ट्रम्प यांचा दावा वारंवार फेटाळला आहे.
ट्रम्प यांच्याकडून पाच युद्ध थांबवल्याचा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांनी भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला. तसेच काँगो (काँगोचे प्रजासत्ताक) व रवांडा, थायलँड व कंबोडिया, इस्रायल व इराण आणि सर्बिया विरुद्ध कोसोव्हो यांच्यातील तणाव नष्ट केला. याआधी ट्रम्प यांनी म्हटलं होतं की मी केवळ युद्ध थांबवली नाहीत तर इराणच्या अणू कार्यक्रमाविरोधातही ठोस पावलं उचलली आहेत. मध्य-पूर्वेतील तणाव रोखण्यासाठी ते गरजेचं पाऊल होतं, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
व्यापाराच्या नावाखाली युद्ध थांबवली – ट्रम्प
ट्रम्प यांनी न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की “व्यापाराच्या मदतीने मी ही युद्ध थांबवली. मी या देशांना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की त्यांनी आपसातील युद्ध चालू ठेवलं तर अमेरिका त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचा व्यापार करार कायम ठेवणार नाही. व्यापार चालू ठेवायचा असेल तर हे सगळं थांबवा. याच दबावामुळे अनेक देशांमधील युद्ध थांबली.”