Donald Trump again claims credit for India-Pakistan ceasefire : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपवण्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. तसेच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी व्यापाराच्या चर्चेतून तोडगा काढण्यात आल्याचा दावा केला आहे.

व्हाईट हाऊसच्या ओव्हल येथील कार्यालयात दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राअध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात आम्ही काय केलं ते पाहिलं तर, ते सर्व प्रकरण (दोन्ही देशातील संघर्ष) पूर्णपणे मिटवले आणि मला वाटतं की ते व्यापाराच्या चर्चेतून मिटवले.आम्ही भारतासोबत मोठा करार करत आहोत. आम्ही पाकिस्तानसोबत मोठा करार करत आहोत…”

ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, “…आणि मी म्हणालो की, ‘तुम्ही लोक काय करत आहात?’ गोळीबार करणारा कोणीतरी शेवटचा असला पाहिजे. पण गोळीबार दिवसेंदिवस वाढत होत होता, मोठा आणि देशांमध्ये खोलवर होत होता. आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, आणि मला सांगायला आवडत नाही, पण मला वाटतं आम्ही ते (दोन्ही देशांमधील संघर्ष) मिटवलं आणि दोन दिवसांनंतर काहीतरी घडलं आणि ते म्हणतात की हा ट्रम्प यांचा दोष आहे.”

ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचे कौतुक देखील केले. ट्रम्प म्हणाले की, ” पण… पाकिस्तानात काही चांगले लोक आहेत आणि काही खूप चांगले, महान नेते आहेत. आणि भारत, मोदी हे माझे माझे मित्र आहेत.” ज्यावर रामाफोसा यांनी “मोदी हे आपल्या दोघांचेही मित्र आहेत” असा प्रतिसाद दिला. यावर ट्रम्प म्हणाले की, “ते एक अत्यंत चांगले व्यक्ती आहेत आणि मी दोघांना कॉल केला. हे काहीतरी चांगलं आहे.”

दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाबाबत ट्रम्प यांनी यापूर्वी देखील असेच विधान केले होते. यावेळी देखील ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचा दावा केला होता.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. ट्रुथ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर झालेल्या चर्चेनंतर मला हे जाहीर करायला आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाली आहे. दोन्ही देशांनी योग्य निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”

भारताने दावा फेटाळला

दरम्यान असे असले तरी भारताने मात्र ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सहा मुद्दयाचे निवेदन जाहीर करत अमेरिकेने शस्त्रविरामासाठी मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच शस्त्रविरामासाठी व्यापार कारणीभूत नसल्याचेही म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओंनी केलेल्या चर्चेच्या आधारावरच शस्त्रविरामाचा निर्णय घेण्यात आल्याचे भारताने ठामपणे सांगितले.

ऑपरेशन सिंदूर

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढला होता. यानंतर पाकिस्तानने भारतातील नियंत्रण रेषेवरील अनेक ठिकाणी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचे प्रयत्न केले होते. यानंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शस्त्रविरामावर एकमत झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.