Donald Trump aide Peter Navarro on India : भारत आता रशिया व चीन या दोघांशी जवळीक साधत असल्याचा दावा करत व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी म्हटलं आहे की “भारताला अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार म्हणून वागणूक हवी असेल, तर त्याने स्वतः एका भागीदाराप्रमाणे वागायला सुरुवात करावी.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व सल्लागार पीटर नवारो यांनी दी फायनॅन्शियल टाइम्समध्ये कठोर शब्दांत भारतावर आगपाखड केली आहे. नवारो यांनी म्हटलं आहे की “भारत रशियन तेलासाठी जागतिक क्लिअरिंग हाऊसप्रमाणे काम करतोय. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना युद्धासाठी डॉलर्स पुरवतोय.”

पीटर नवारो यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय की “भारताला अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार म्हणून वागणूक हवी असेल तर त्याने तसं वागलं पाहिजे. एका भागीदाराप्रमाणे कृती केल्यास भारताला भागीदारासारखीच वागणूक मिळेल.” दरम्यान, नवी दिल्लीकडून यावर खरपूस प्रतिक्रिया येऊ शकते. कारण नवारो यांनी या वक्तव्याद्वारे युक्रेनमधील चालू असलेल्या युद्धासाठी थेट भारतालाच जबाबदार ठरवलं आहे.

दरम्यान, दी इंडियन एक्सप्रेसला नवी दिल्लीतील सुत्रांनी सांगितलं की युद्धामुळे निर्माण झालेली महागाई व तिच्या परिणामांपासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी भारत स्वस्त रशियन तेल खरेदी करत आहे. मात्र, भारताला लक्ष्य करून ट्रम्प प्रशासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पीटर नवारो चीनविरोधातही आक्रमक

नवारो हे सातत्याने रशिया व चीनविरोधात भूमिका घेत आले आहेत. आता भारताचा या दोन देशांबरोबरचा व्यापार त्यांना खुपत असल्याचं त्यांच्या आतापर्यंतच्या वक्तव्यांवरून दिसून येत आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात नवारो यांनी चीनविरोधातील आयात शुल्काचं समर्थन केलं होतं. तसेच व्यापार तूट अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी वाईट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नवारो यांनी चीनविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी चीनकडून अधिक आयात शुल्क वसूल करण्याची शिफारस केली आहे.

अमेरिकेची दुटप्पी भूमिका

दुसऱ्या बाजूला भारताने अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेवर सातत्याने आक्षेप घेतला आहे. कारण रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारताविरोधात आक्रमक झालेली अमेरिका रशियन ऊर्जा आयात करणाऱ्या चीन व युरोपविरोधात चकार शब्द काढत नाही.