अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केलीआहे. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “एक गोष्ट लक्षात घ्या की भारत आमचा मित्र आहे, परंतु, त्यांनी आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावलं आहे. जे जगातील सर्वाधिक टॅरिफपैकी एक आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याबरोबर फारसा व्यापार करू शकलो नाही. याशिवाय भारताकडून अनेक आर्थिक अडथळे (non-monetary trade barriers) निर्माण केले जात आहेत. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ते खूपच त्रासदायक आहेत.”
भारताकडून दंड वसूल केला जाईल : ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “भारत गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक लष्करी उपकरणं, शस्त्रं रशियाकडून खरेदी करत आला आहे. तसेच ऊर्जा खरेदीतही भारत चीनबरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू आहे. रशियाचा युक्रेनमधील विध्वंस थांबावा यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ व तथा दंड भरावा लागेल. वर नमूद केलेल्या कारणांसाठी भारताला दंड भरावा लागेल.”
गेल्या काही दिवसांपासून भारत व अमेरिकेत व्यापार करार होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये यासंबंधी बैठका चालू होत्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा करार पूर्ण होईल असे दावे केले जात होते. मात्र, २९ जुलैपर्यंत हा करार पूर्ण झाला नाही.
ट्रम्प यांची भारतावर नराजी

दरम्यान मंगळवारी ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की भारत व अमेरिकेमधील व्यापार करार अंतिम झालेला नाही. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना विचारलं की अमेरिका भारतावर २० ते २५ टक्के आयात शुल्क लागू करेल का? त्यावर ट्रम्प म्हणाले हो, मला तसं वाटतं. भारत आपल्याकडून बरंच आयात शुल्क वसूल करत आला आहे. भारत आपला मित्र असला तरी असं वागत आला आहे.”
ट्रम्प यांचं दबावतंत्र नेमकं कशासाठी?
अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांना सहजपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज त्यांनी २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याबाबत केलेली घोषणा त्या दबावतंत्राचाच एक भाग आहे.