Donald Trump asked for Nobel backing PM Modi rejected : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. यादरम्यान ११ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या फोन कॉलसंबंधी नवीन माहिती समोर आली आहे. ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे आजवरच्या सर्वात खालच्या थरावर जाऊन पोहचल्याचे दिसून येत आहे.
द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील संबधांना १७ जून रोजी झालेल्या एका फोन कॉल दरम्यान कलाटणी मिळाली. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी बोलताना पुन्हा एकदा त्यांनीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष संपवल्याचा दावा केला.तसेच या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी पाकिस्तान त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नॉमिनेट करेल आणि भारतानेही देखील तसेच करावे असेही सुचवले.
या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मोदींनी ट्रम्प यांचे हे विधान नाकारले आणि स्पष्ट केले की, शस्त्रविरामाचा निर्णय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहमतीने घेण्यात आला आणि यामध्ये अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता. तसेच दोन नेत्यांमधील या संवादानंतर मोदी नाराज झाल्याचे सांगितले जाते. या विरोधानंतरही ट्रम्प हे सातत्याने त्यांचा दावा जाहीरपणे मांडत राहिले, ज्यामुळे नवी दिल्ली आणखीनच चिडल्याचे दिसून आले. या फोन कॉलनंतर पुन्हा अद्यापपर्यंत हे दोन नेते एकमेकांशी बोललेले नाहीत.
दोन नेत्यांमध्ये झालेल्या ३५ मिनिटांच्या फोन कॉलबद्दल ब्लूमबर्गने अशीच माहिती दिल्यानंतर आता द न्यू यॉर्क टाईम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या रिपोर्टमध्ये नवी दिल्ली येथील एका नाव उघड न करण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती देण्यात आली आहे की, मोदींनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम घडवून आणल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याचा अत्यंत स्पष्टपणे विरोध केला होता. “भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि कधीच स्वीकारणार नाही,” असे मोदींनी सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबरोबर अचानक फोटो काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी हा फोन कॉल केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी नकार दिला. त्यानंतर यासाठी क्रोएशियाची भेट नियोजित असल्याचे कारण जाहीर करण्यात आले.
दरम्यान अधिकाऱ्याच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, ट्रम्प यांनी मुनीर यांचे स्वागत करणे याला भारताने मुनीर यांच्यावर आरोप असलेल्या दहशतवादी कारवायांनावैधता देण्यासारखे मानले.
भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
या फोन कॉलच्यानंतर काही आठवड्यांनी ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या मालावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली, आणि त्यानंतर रशियाकडून तेल घरेदी करत असल्याचे सांगत हे शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले. या शुल्काचा इतर देशांच्या तुलनेत भारताला मोठा फटका बसला.
दरम्यान अमेरिका आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहेत.