China Students Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफची जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या माध्यमातून भारत, रशियासह अनेक देशांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास एकूण ५० टक्के आयातशुल्क जाहीर केलेलं आहे. तसेच आयातशुल्कावरून अमेरिका चीनलाही इशारा देत आहे. असं असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबत एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
६ लाख चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकन व्हिसा देण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन संबंधाबाबत हे एक महत्वाचं पाऊल मानलं जाऊ शकतं. खरं तर ट्रम्प प्रशासन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबाबत कठोर भूमिका घेत आहे. मात्र, असं असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ लाख चिनी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन विद्यापीठांचे दरवाजे उघडले आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
या निर्णयासंदर्भात एका अमेरिकन नेत्यानं म्हटलं की, वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचे संबंध आहेत. जे त्यांच्या प्रशासनाच्या अमेरिका प्रथम या धोरणाच्या नाट्यमय बदलाचे संकेत देते. याआधी ट्रम्प प्रशासनाने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेल्या किंवा महत्त्वाच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांच्या व्हिसाच्या संदर्भात कठोर भूमिका घेतली होती. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी देणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे. ६ लाख विद्यार्थी महत्वाचे असून आम्ही त्याबद्दल चीनशी जुळवून घेणार आहोत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे चीनवरही मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादण्याचा इशारा दिलेला असला तरी दुसरीकडे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणावाचा चिनी विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्याची परवानगी दिली जाईल असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयावर समर्थकांमध्ये नाराजी
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध मानला जात आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने चिनी नागरिकांवर, विशेषतः कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्यांवर आणि संवेदनशील संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व्हिसा निर्बंध लादण्याबाबत त्यांनी भाष्य केलं होतं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेचे दरवाजे उघडल्यामुळे ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांचा असा विश्वास आहे की. ट्रम्प अमेरिका फर्स्ट अजेंडापासून दूर गेले आहेत. या निर्णयावर लॉरा लूमर यांनी तीव्र टीका केली आहे.
