पीटीआय, वॉशिंग्टन, नवी दिल्ली

भारत आणि पाकिस्तानदरम्यान मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला. आपण हस्तक्षेप केल्यानंतरच हा संघर्ष थांबला या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, पाडण्यात आलेली सर्व विमाने एकाच देशाची होती किंवा दोन्ही देशांची हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

लष्करी संघर्षात अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे ट्रम्प यांचे दावे केंद्र सरकारने खोडून काढले आहेत, दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान चर्चा झाल्यानंतर शस्त्रविरामाचा निर्णय घेण्यात आला असे सरकारने अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपल्याच मध्यस्थीने लढाई थांबल्याचा दावा करणे थांबवलेले नाही. त्यांनी शुक्रवारी व्हाइट हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाच्या सेनेट सदस्यांना रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांनी या दाव्याचा पुनरुच्चार केला.

पूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षांना जे काम करणे आठ वर्षांमध्ये शक्य झाले असते ते आपल्या प्रशासनाने केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत साध्य केले असा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला. आम्ही बरीच युद्धे थांबवली आहेत आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.

मोदी यांनी उत्तर द्यावे – काँग्रेस

मे महिन्यातील लष्करी संघर्षात पाच लढाऊ विमाने पाडली या ट्रम्प यांच्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या ७०पेक्षा जास्त दिवसांच्या कालावधीत २४ वेळा भारत व पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे, याबद्दल मोदी यांनी स्पष्ट आणि निःसंदिग्ध निवेदन दिले पाहिजे असे काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत, पाकिस्तान संघर्ष सुरू होता. वास्तवात चार ते पाच विमाने पाडण्यात आली. मला वाटते प्रत्यक्षात पाच विमाने पाडण्यात आली. हे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत आणि ते एकमेकांवर हल्ले करत होते. ही लढाई मोठी होत होती. आम्ही व्यापाराच्या माध्यमातून त्याचे निवारण केले.डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका